नाना पटोले, किशोर गजभिये यांचा आरोप

नागपूर लोकसभा आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत घोळ झाला असून निवडणूक प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम करीत आहेत, असा आरोप दोन्ही मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मतदानानंतर कळमना मार्केटमध्ये ४८ तासांनी पोहचतात तर ग्रामीण भागातील त्याआधी येतात. शहरातील ईव्हीएम इतका काळ कुठे होते, असा सवाल नाना पटोले यांनी यावेळी केला. तसेच त्यांनी बुथनिहाय व्हिडीओ चित्रिकरण उपलब्ध करून देण्याची मागणी केली.  तसेच रामटेकचे काँग्रेसचे उमेदवार म्हणाले, रामटेक लोकसभेच्या उमरेड विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम ज्या तात्पुरत्या स्ट्राँग रूममध्ये ठेवले होते तेथील डीव्हीआर चोरीला गेले आहे. प्रत्येक विधानसभानिहाय तात्पुरती स्टाँग रूम केली जाते. ती दीड ते दोन दिवसांकरिता असते. त्यात ईव्हीएम आणि कन्ट्रोल युनिट ठेवले जाते. सगळा हिशोब लागल्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी ईव्हीएम पावठल्या जातात. ११ एप्रिलला रात्री ९ नंतर ईव्हीएम उमरेड येथील आयटीआयमधील स्ट्राँग रूममध्ये आणणे सुरू झाले. हे आयटीआय गावाबाहेर आहे. या परिसरात वर्दळ नाही. हे तात्पुरती स्ट्राँग रूम असली तरी सुरक्षेची सर्व काळजी घेणे बंधकारक असते. साधारणत: १२ एप्रिलला दुपापर्यंत ईव्हीएम आणि कंट्रोल युनिट आणणे सुरू होते. येथे स्ट्राँग रूमचे नियम पाळण्यात आले नाही. स्ट्राँग रूमला चारही बाजूने सुरक्षा असणे आवश्यक आहे. कोणताही भाग खुला राहता कामा नये. खिडक्या बंद करणे आवश्यक असते. परंतु ही खोली अभेद्य नव्हती. ईव्हीएम १२ तारखेनंतर नागपूरला रवाना करण्यात आल्या. तात्पुरती खोली असली तरी सीसीटीव्ही बसवणे आवश्यक असते. स्ट्राँग रूममधील प्रत्येक हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून डीव्हीआरमध्ये साठवले जाते. डीव्हीआरमध्ये  आवाजसह हालचाली रेकॉर्ड केल्या जातात. १२ तारखेला रात्री सीसीटीव्ही कॅमेरे होते, डीव्हीआर होते.  त्याच्या सुरक्षेसाठी एक पीएसआय, पोलिसांचा बंदोबस्त होता. १३ तारखेला चोरीची घटना उघडकीस आली. दोन एलसीडी आणि डीव्हीआर चोरीला गेले. डीव्हीआर चोरीला जाणे ही फार गंभीर बाब आहे. कारण डीव्हीआरमध्ये सगळा रेकॉर्ड असतो. त्यात ११ एप्रिलच्या रात्रीपासून ईव्हीएम आल्यापासून तर नागपूरला ईव्हीएम पाठवण्यातपर्यंत सगळा रेकॉर्ड त्यात आहे. १३ एप्रिलला चोरीची घटना उघडकीस आली, पण दोन दिवस त्याची दखलच घेतली नाही. १५ तारखेला ही बाब उघड झाल्यावर कारवाईला सुरुवात केली. कोणती कारवाई केली? अशी घटना घडल्याबरोबर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगायला हवे. मुख्य निवडणूक आयोगाला कळवायला हवे होते. ते त्यांनी केले नाही, तर शांत बसले. आम्हाला जेव्हा कळले तोपर्यंत पाच-सहा दिवस निघून गेले होते. आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देखील कळवले. तेथील सहायक निवडणूक अधिकारी यांनी एवढी मोठी चोरी झाल्यानंतर किरकोळ बाब आहे, असे म्हटले आहे. हा सगळा लपावा-छपवीचा प्रकार आहे. त्यांनी एफआयआर का केला नाही, असा प्रश्न किशोर गजभिये यांनी उपस्थित केला.

किशोर हजारे कोण?

सहायक निडणूक अधिकारी जगदीश लोंढे यांच्यासोबत उठबस असणारे किशोर हजारे कोण आहेत, ते दहा-दहा तास त्यांच्यासोबत काय करीत होते, ते स्ट्राँग रूममध्ये का आले होते, याची चौकशी  झाली पाहिजे. तसेच येथे तैनात दोन्ही पोलिसांची चौकशी व्हावी. त्यांनी कर्तव्यात कसूर केला आहे. त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाशिवाय जागा का सोडली, असा प्रश्न किशोर गजभिये यांनी उपस्थित केला.

व्हिडीओ चित्रिकरण सुरक्षित

उमरेड येथे तात्पुरते तयार करण्यात आलेले स्ट्राँग रूम पोलिसांच्या सुरक्षेत होते. केवळ स्ट्राँग रूमच्या बाहेर पोलीस सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या गार्ड रूममधील दोन एलसीडी टीव्ही व डीव्हीआर गहाळ झाल्याचे १५ एप्रिल २०१९ रोजी सहायक निवडणूक अधिकारी उमरेड यांच्या निर्दशनास आले. त्यानंतर तात्काळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कवळण्यात आले. स्ट्राँग रूममधील व्हिडीओ चित्रिकरणाचे कव्हरेज सहायक निवडणूक अधिकारी यांच्याकडे सुरक्षित आहे. यासंदर्भात पोलीस चौकशी करीत आहेत, परंतु या घटनेमुळे मतमोजणीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी व नागपूर जिल्ह्य़ाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी म्हटले आहे.