|| नीरज राऊत

काँग्रेसमधून आमदार, भाजपमधून वर्षभरासाठी खासदार आणि आता शिवसेनेचा उमेदवार.. गेल्या पाच वर्षांत तीन पक्षांचा प्रवास करणाऱ्या राजेंद्र गावित यांची लढत ‘बहुजन विकास आघाडी’चे बळीराम जाधव यांच्याशी होत आहे. वर्षभरापूर्वीच्या पोटनिवडणुकीतील मतांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास गावित यांचे पारडे जड वाटते. तरीही गावित यांची प्रचारात पार दमछाक झाली आहे.

आधीचा डहाणू (आता पालघर) मतदारसंघ हा वर्षांनुवर्षे भाजपच्या ताब्यात होता. शिवसेनेने युती करताना हा मतदारसंघ पदरात पाडून घेतला. परंतु शिवसेनेकडे प्रभावी उमेदवार नव्हता. शेवटी भाजपकडून उसनवारीवर उमेदवार आयात करण्याची वेळ शिवसेनेवर आली.

गेल्या वर्षी पोटनिवडणुकीत भाजपचे गावित यांना दोन लाख ७२ हजार, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना दोन लाख ४३ हजार आणि बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना दोन लाख २२ हजार मते मिळाली होती. २०१४मध्ये भाजपचे चिंतामण वनगा यांना पाच लाख ३३ हजार, तर जाधव यांना तीन लाखांच्या आसपास मते मिळाली होती. याचाच अर्थ युती एकत्र लढल्यास पाच लाखांपेक्षा जास्त मते मिळतात. पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले तरी उभयतांच्या मतांची बेरीज पाच लाखांच्या आसपासच होते. याचाच अर्थ शिवसेनेच्या गावित यांना विजयाची संधी दिसते. गेली १०-१२ वर्षे स्थानिक शिवसैनिक राजेंद्र गावित यांच्या विरोधात प्रचार करत होता. आता शिवसेना कार्यकर्त्यांवर गावित यांचाच प्रचार करण्याची वेळ अचानक आली. त्यांचा प्रचार कसा करावा, असा प्रश्न अनेक शिवसैनिकांना पडला होता.

निवडणूक चिन्हाच्या संदर्भात बहुजन विकास आघाडीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सुमारे २० वर्षे असलेल्या चिन्हाचा त्यांना त्याग करावा लागला. वसई- विरार महानगरपालिकेत एक हाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीला वसई, नालासोपारा आणि बोईसर या त्यांच्याकडे असलेल्या विधानसभा क्षेत्रांमध्ये कार्यकर्त्यांची फौज उपलब्ध आहे, मात्र अन्य ठिकाणी त्यांना मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. डहाणू, विक्रमगड या विधानसभा क्षेत्रांमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांची मदत महत्त्वाची ठरणार आहे.