उमेदवाराबरोबर एक दिवस

शिवाजी खांडेकर

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा १५ वर्षांतील कामगिरीबाबत बोलण्यावर भर

शिरूर मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरूर तालुक्यातील भोरगिरी येथे कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. सकाळी साडेआठपासून आढळरावांची प्रतीक्षा करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी तोपर्यंत न्याहरी आटोपून घेतली. साडेनऊ वाजता आढळराव यांचे आगमन होताच घोषणा आणि फटाक्यांची आतषबाजी करून गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. सकाळी साडेनऊ वाजता प्रचारफेरीला सुरुवात झाली. मतदारांशी संपर्क साधून नंतर कोपरा सभा घेत भोरगिरीहून प्रचाराचा ताफा पुढच्या गावाकडे रवाना झाला.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचारात दिवसभरात राजगुरुनगर तालुक्यातील भोरगिरी ते कडूस दरम्यानच्या बावीस गावांशी आणि वाडय़ा वस्त्यांमधील मतदारांशी संपर्क साधला. सकाळी दहा वाजता भोरगिरी येथील सभा उरकल्यानंतर टोकावडे, मंदोशी, धुबोली आदी अदिवासी वाडय़ांवस्त्यांमधील मतदारांशी त्यांनी संपर्क साधला.

मजल दरमजल करत आढळरावांच्या वाहनांचा ताफा दुपारी बाराच्या सुमारास डेहणे गावात दाखल झाला. गावाच्या कमानीजवळ गावकऱ्यांनी त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार स्वागत केले. डेहणे फाटय़ावरून ग्रामपंचायतीपर्यंत पदयात्रा झाली आणि नंतर गावातच उघडय़ा जीपवर सभा झाली. डेहणे येथील सभा उरकून चाळीस ते पन्नास मोटारींचा ताफा खरोशी, आव्हाट, वाळद मार्गाने वाडा गावात पोहोचला.

दुपारी दीडच्या सुमारास खासदार आढळरावांची उघडय़ा जीपमधून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. उघडय़ा जीपमधील मिरवणूक सभामंडपामध्ये पोहोचल्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. वाडय़ाचा आठवडी बाजार असल्यामुळे वाडय़ा वस्त्यावरील नागरिक बाजाराच्या निमित्ताने वाडय़ामध्ये दाखल झाले होते. त्यामुळे सभेला चांगली गर्दी होती. सभेत खासदार आढळरावांनी पंधरा वर्षांत केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. दहा वर्षे विरोधी पक्षात असल्यामुळे निधी मिळवण्यात अडचणी आल्या. मात्र, पाच वर्षांत सत्ताधारी खासदार असल्यामुळे मतदार संघात विकासकामांसाठी भरीव निधी आणू शकलो, असे त्यांनी मतदारांना सांगितले. दुपारी तीनच्या दरम्यान सभा संपल्यानंतर वाडय़ातील समर्थ मंगल कार्यालयामध्ये नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. रणरणत्या उन्हात प्रचारात सहभागी झालेले कार्यकर्ते भुकेने व्याकूळ झाले होते. त्यांनी जेवण करून घेतले तर आढळरावांनी आणि त्यांच्या बरोबर असलेल्या आमदार गोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी घरच्या जेवणाच्या डब्यातील कांदापातीची भाजी आणि बाजरीची भाकरी असे जेवण घेतले. जेवणानंतर प्रचाराचा ताफा गुंडाळवाडी, बुरसेवाडी, कान्हेवाडी, कडधे, कमान येथे पोहोचला. तेथे मतदारांशी संपर्क साधण्यात आला. चास येथील सभा उरकून ताफा सायगाव, वेताळे गावाकडे मार्गस्थ झाला. वेताळेला सभा उरकून सायंकाळच्या प्रचारासाठी साबुर्डी, बाशेरे, कोहिंडे बु. (रौंधळवाडी), गारगोटवाडी येथून कडूस गावासमध्ये ताफा पोहचला. कडूस येथे रात्री साडेआठ वाजता सभा सुरू झाली. सव्वानऊच्या सुमारास कोपरा सभा संपवून प्रचाराची सांगता करण्यात आली.

उत्साही स्वागत

आदिवासी वाडय़ा-वस्त्यांमध्ये प्रचार करताना उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव यांचा प्रचार दौरा प्रत्येक गावात नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिराने पोहचत होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मात्र खासदार आढळराव यांचे प्रत्येक गावात फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये उत्साहाने स्वागत केले जात होते.