काँग्रेस, सपा, बसपाचा ‘अली’वर विश्वास असेल तर भाजपाचा ‘बजरंग बली’वर विश्वास आहे असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी म्हणाले. बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या देवबंदमधील भाषणाचा संदर्भ देताना त्यांनी हे विधान केले. मेरठ येथील सभेमध्ये योगी आदित्यनाथ बोलत होते. येथे ११ एप्रिलला मतदान होणार आहे.

निवडणुकीत बजरंग बलीचे समर्थक आपल्याला सोडणार नाहीत हे त्यांना माहित आहे म्हणून काँग्रेस, सपा आणि बसपा अल्पसंख्यांकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस, सपा, बसपाचा अलीवर विश्वास असेल तर आमचा बजरंग बलीवर विश्वास आहे. बजरंग बलीचे समर्थक आपल्याला सोडणार नाहीत हे सपा, बसप आणि काँग्रेसला ठाऊक आहे म्हणून ते ‘अली, अली’ ओरडत आहेत असे योगी म्हणाले.

उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादव यांची महाआघाडी झाल्यानंतर मागच्या आठवडयात देवबंदमध्ये त्यांची पहिली संयुक्त सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपा आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे मतदारांना खासकरुन मुस्लिमांना मतविभाजन टाळण्यासाठी सावध राहण्याचे आवाहन केले. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातल्या आठ जागांवर मतदान होत आहे.

काँग्रेस भाजपाचा सामना करण्यासाठी सक्षम नाही. मला तुम्हा सर्वांना खासकरुन मुस्लिमांना सांगायचे आहे की, इथे तुम्ही काँग्रेसला मतदान केले तर त्याचा फायदा भाजपाला होईल. तुम्ही तुमच्या मतांचे विभाजन टाळा असे मायावती म्हणाल्या होत्या. उत्तर प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने मायावतीच्या भाषणाची दखल घेतली असून सहारनपूरच्या प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे.