News Flash

मतफुटीवर भवितव्य ठरणार!

आपल्यामागे असलेले बळ दाखविण्यासाठी नाशिकमध्ये मेळाव्याद्वारे शक्तिप्रदर्शनही केले.

मतफुटीवर भवितव्य ठरणार!
(संग्रहित छायाचित्र)

वंचित बहुजन आघाडी, अपक्ष उमेदवारामुळे नाशिक मतदारसंघात चुरस

अविनाश पाटील, नाशिक

प्रमुख व्यक्तिरेखांच्या जोडीला नंतर इतर पात्रेही आल्यावर चित्रपटात खरा रंग भरतो. त्याप्रमाणेच नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे झाले आहे. प्रारंभी महायुतीकडून शिवसेनेचे हेमंत गोडसे विरुद्ध महाआघाडीकडून राष्ट्रवादीचे समीर भुजबळ अशी दुरंगी वाटणारी निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि प्रबळ अपक्ष उमेदवारामुळे रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे.

नाशिक मतदारसंघात गोडसे आणि भुजबळ यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार आणि भाजपचे बंडखोर माणिक कोकाटे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. गोडसे, भुजबळ तसेच कोकाटे यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली असली तरी तिघांनी प्रचार मात्र त्याआधीच सुरू केला होता. नाशिकमधून सलग दुसऱ्यांदा खासदारकीत यश मिळत नसल्याचे कारण पुढे करीत गोडसेंना उमेदवारी देण्यास शिवसेनेतीलच काही जणांनी विरोध केला होता. परंतु, शिवसेनेने पुन्हा त्यांच्यावरच विश्वास टाकला, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधून कोणी उमेदवारी करायची, हे ठरविण्याचा अधिकार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दिला होता. गोडसेंप्रमाणेच राष्ट्रवादीतूनही काही जणांचा समीर भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध होता. युती होणार नाही या अपेक्षेने भाजपचे सिन्नरचे नेते आणि माजी आमदार माणिक कोकाटे यांनीही आधीच उमेदवारी गृहीत धरून प्रचारास सुरुवात केली होती. युती झाल्याने कोकाटे यांची अडचण झाली. सिन्नर मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने विधानसभेसाठीही संधी मिळण्याची शक्यता नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी लोकसभेच्या रिंगणात ठाम राहण्याचा निश्चय केला. आपल्यामागे असलेले बळ दाखविण्यासाठी नाशिकमध्ये मेळाव्याद्वारे शक्तिप्रदर्शनही केले. या मेळाव्यात त्यांनी भुजबळ आणि ठाकरे यांच्यात संगनमत असल्याचा आरोप करतांनाच भुजबळांच्या संपत्तीसह गोडसे आणि भुजबळ यांच्या उंचीचा उल्लेख केला. गोडसे आणि भुजबळ हे दोघेही जातीयतेचे भांडवल करीत असल्याची टीका करीत कोकाटे यांनी यापुढील प्रचाराची दिशा जवळपास स्पष्ट केली.

कोकाटे हेही मराठा समाजाचे असल्याने त्यांची उमेदवारी गोडसे यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकते, असा अंदाज २००९ च्या निवडणुकीच्या निकालावरून काढला जात आहे. त्या वेळीही मनसेकडून असलेले गोडसे आणि शिवसेनेचे दत्ता गायकवाड या दोन मराठा उमेदवारांमुळे समीर भुजबळ यांचे पारडे जड होऊन ते विजयी झाले होते. कोकाटेंच्या उमेदवारीमुळे भुजबळ गोटात थोडी खुशी असली, तरी वंचित बहुजन आघाडीही मैदानात असल्याने हक्काची मते दुरावण्याची चिंता त्यांना आहे. त्यामुळेच कोकाटेंच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीने गोडसे-भुजबळ लढत सध्यातरी समान पातळीवर आणून ठेवली आहे. अशा परिस्थितीत थेट खालपर्यंत पसरलेले कार्यकर्त्यांचे जाळे, मतदारांशी असलेला संपर्क आणि पक्षाप्रमाणेच वैयक्तिक प्रतिमा ही त्रिसूत्री दोघांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रवादीसाठी उमेदवार म्हणून समीर भुजबळ यांचा चेहरा पुढे असला तरी काका छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. ईडीमुळे अनेक दिवस काका-पुतणे तुरुंगात राहिल्याने विरोधकांकडून प्रचारात या मुद्दय़ाचा वापर केला जाऊ लागला आहे. या प्रचारास चपखल उत्तर देण्यासाठी भुजबळांकडून याआधी मतदारसंघात करण्यात आलेल्या कामांवर भर देण्यात येत आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपविरोधात आघाडी उघडल्याने ही आयती रसद भुजबळांना मिळाली आहे. शरद पवार यांनी सय्यद पिंप्री येथे घेतलेल्या जाहीर सभेत पवारांबरोबरच राज यांचीही प्रतिमा झळकल्याने राष्ट्रवादीसाठी असलेले त्यांचे महत्त्व लक्षात येईल. तथापि, राज यांनी सभांसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नाशिकचे नाव नसल्याने राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी आहे. कधी काळी भुजबळांच्या मफलरला हात लावण्याची जाहीर भाषा करणारे राज हे नाशिकमध्ये भुजबळांसाठी सभा घेतील काय, आणि घेतल्यास नाशिककरांच्या ते कितपत पचनी पडेल, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

पाणीटंचाईचा मुद्दा दुय्यम?

टंचाई आणि दुष्काळाच्या झळांनी जिल्ह्य़ाच्या इतर ग्रामीण भागाप्रमाणेच मतदारसंघातील सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्याचा काही भाग होरपळून निघाला आहे. त्यामानाने शहरी भागाला अद्याप पाणीटंचाईची फारशी झळ बसलेली नाही. पहिल्या टप्प्यात महायुती आणि महाआघाडी दोघांनीही ग्रामीण भागातच प्रचार केंद्रित केला असला तरी या भागास सर्वाधिक प्रमाणात भेडसावणाऱ्या टंचाईच्या मुद्दय़ाला दोन्ही बाजूंकडून केवळ ओझरता स्पर्श केला जात आहे. त्यापेक्षा राष्ट्रवादीकडून कृषिमालास मिळणारा अत्यल्प भाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाच वर्षांत ठप्प झालेला विकास आणि मोदींवर टीका यावर अधिक भर दिला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2019 3:05 am

Web Title: independent candidate vanchit bahujan aghadi create competition in nashik constituency
Next Stories
1 माढय़ातील हवेचा अंदाज आल्यानेच राष्ट्रवादीच्या कप्तानाची माघार
2 ‘राष्ट्रवादी’ नाव केवळ धुळफेक करण्यासाठीच?
3 अनंत गितेंकडून आचारसंहितेचा भंग
Just Now!
X