ख्यातनाम उद्योगपती व जेएसडब्ल्यू समूहाचे सर्वेसर्वा सज्जन जिंदल यांनी मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला होता. आज त्यांनी ट्विट करत ईव्हीएम बाबत आपले मत व्यक्त केले आहे. एकापाठोपाठ एक असे दोन ट्वीट करताना जिंदल यांनी “मागील दोन दशकांपासून आपल्या देशातील सर्व निवडणुकांसाठी ईव्हीएमचा सतत वापर केला गेला आहे आणि जागतिक पातळीवर आदरणीय लोकशाही प्रक्रिया सुनिश्चित केली आहे. मग आताच एवढा गोंधळ का आहे? असे जिंदल यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले.

मला विश्वास आहे कि निवडणूक मतमोजणी प्रक्रिया निर्विवाद आहे आणि तपासणी आणि संतुलनाचे अनेक स्तर आहेत. आम्हाला अशा प्रक्रियेवर विश्वास ठेवावा लागेल जे नेतृत्व भारतीय नागरिकांच्या आदेशाचे प्रतिनिधीत्व करतील. जिंदल यांनी आपल्या ट्विट्समध्ये भारतीय निवडणूक आयोग कार्यालयाच्या ट्विटर हँडल्सनाही टॅग केले आहे.

सज्जन जिंदल यांनी मंगळवारी दोन ट्विट केले होते.  “सध्याच्या सरकारने अर्थव्यवस्थेला आपल्या कार्यकाळादरम्यान जोरदार चालना दिली आहे. त्यामुळे या सरकारला आणखी पाच वर्षे संधी मिळालीच पाहिजे. एक्झिट पोलमुळे सेन्सेक्सला गेल्या १० वर्षांमधील सर्वात मोठी उसळी पाहायला मिळाली. यातून केंद्रातील विद्यमान नेतृत्वाखालीच अर्थव्यस्थेची विकासाकडे वाटचाल होईल हे स्पष्ट होते”, असे त्यांनी मंगळवारच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.