26 September 2020

News Flash

मी उमेदवार : दक्षिण मध्य मुंबई

मतदारसंघातील जुन्या व जर्जर इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला. रिफ्युजी कॉलनी आणि एलआयसी इमारतींची समस्या सोडविली.

(संग्रहित छायाचित्र)

मतदारसंघात  मोठय़ा प्रमाणावर कामे केली

राहुळ शेवाळे, शिवसेना

(संग्रहित छायाचित्र)

* गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात लोकांना उपयुक्त ठरतील अशी कोणती ठळक कामे केलीत?

लोकसभेत खासदार म्हणून केलेल्या पहिल्याच भाषणात मी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचा मुद्दा मांडला. या पाच वर्षांत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दक्षिण-मध्य मुंबईत अनेक प्रकल्प मार्गी लावले. गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या धारावी पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले. बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लावला. मतदारसंघातील जुन्या व जर्जर इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला. रिफ्युजी कॉलनी आणि एलआयसी इमारतींची समस्या सोडविली.

मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळीबांधवांच्या गावठाण आणि कोळीवाडय़ांना न्याय मिळवून दिला. दादर, सायन, माटुंगा, चेंबूर यांसह मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले. या स्थानकांमध्ये सरकते जिने, फूटओव्हर ब्रिज, गार पाण्याचे कूलर यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध केल्या. मुंबईच्या रेल्वे वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या स्थानकाच्या पुनर्विकासाला सुरुवात होऊन या परिसरातील वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांची गर्दी या समस्या सोडवण्यात येतील.

*  मुंबईतील सर्वात महत्त्वाचा रेल्वे किंवा वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी योजना काय आहे?

रेल्वे प्रवाशांचा बराचसा प्रश्न एमयूटीपी-३ एमध्ये सुटलेला आहे. यातील प्रकल्प पाच वर्षांत राबविले की मुंबई उपनगरीय रेल्वेचे बरेच प्रश्न सुटतील. यामध्ये रेल्वेची सिग्नल यंत्रणा आधुनिक केली जाणारी सीबीटीसी योजना आहे. त्यामुळे लोकल फेऱ्या वाढत जातील व प्रवासही झटपट होईल. तसेच १५ डब्यांच्या लोकलही या प्रकल्पानुसार वाढण्यास मदत होणार आहे. वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर राहणार आहे.

* तुम्हालाच लोकांनी का मते द्यावीत असे वाटते?

गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून युनायटेड नेशन्सच्या वतीने ‘सवरेत्कृष्ट संसदपटू’ हा पुरस्कार मला मिळाला आहे. तसेच लोकसभेतील ९४ टक्के उपस्थिती, एक हजाराहून अधिक विचारलेले प्रश्न, पाच वर्षांत मांडलेली खासगी विधेयके. याची दखल घेत दिल्लीतील एका संस्थेने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुरस्कार देऊन माझा गौरव केला. संसदेतील माझ्या कामगिरीमुळे देशातल्या सर्व खासदारांमध्ये माझा नववा क्रमांक लागतो. पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर जनतेसमोर जात आहे. जनता नक्कीच मला पुन्हा एकदा संधी देईल.

* पुढील पाच वर्षांत कोणती कामे करणार?

नवीन विकास आराखडय़ामुळे मुंबईचे सर्व प्रश्न सुटतील. या आराखडय़ाची अंमलबजावणी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला करता येणे शक्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. केंद्र सरकारने त्यासाठी एक विशेष पॅकेज जाहीर केले पाहिजे.

* तुमच्या मतदारसंघात शिवसेनेने कशा पद्धतीने तयारी केली आहे? मनसेची मते सेनेला की काँग्रेसला असतील?

काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर दक्षिण मध्य मुंबईतील मतदार नाराज आहेत. खुद्द काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचीच नाराजी आहे. गायकवाड यांचा गेल्या ३५ ते ४० वर्षांतील साधा कार्यअहवालही जनतेपर्यंत पोहोचलेला नाही. फक्त घराणेशाहीला उमेदवारी मिळत गेली व त्याचा काहीएक फायदा झाला नाही. त्यामुळे या वेळीही त्यांच्या निष्क्रियतेविरोधातच जनता मतदान करेल. मनसेची मते ही शिवसेनेलाच मिळतील. मनसे कार्यकर्ते जरी काँग्रेसच्या प्रचारात दिसले तरी त्याचा फायदा होणार नाही. कार्यकर्त्यांचे व जनतेचे प्रेम हे शिवसेनेवरच आहे आणि ते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिसून येईल.

मतदारसंघात कामे नाहीत, लोकसभेत आवाज नाही

एकनाथ गायकवाड (काँग्रेस)

(संग्रहित छायाचित्र)

* गेल्या पाच वर्षांतील आपल्या खासदाराच्या कामाविषयी काय सांगाल?

विद्यमान खासदार गेल्या पाच वर्षांत मतदारसंघाकडे फिरकलेच नाहीत.  खासदार निधीतून सगळेच खासदार कामे करतात. सर्वसाधारण निधीतून तुम्ही किती व कोणती कामे केलीत ते सांगत नाहीत. ज्या आश्वासनांवर ते निवडून आले त्यापैकी किती आश्वासने पूर्ण केली? याचे उत्तर नकारात्मक मिळेल. काही मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी दिल्लीत संसदेबाहेर जेव्हा भारतीय राज्यघटना जाळली, त्याचा आमच्या खासदारांनी निषेध केला नाही वा त्याबद्दल लोकसभेत आवाज उठविला नाही. गुजरातमध्ये उना येथे मागासवर्गीय तरुणांना अमानुष मारहाण केली. त्यावर आमच्या खासदारांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला नाही. मुंबईच्या विकासासाठी काही भूमिका मांडली नाही. काँग्रेस सरकारच्या काळातच मुंबई हे जागतिक आर्थिक केंद्र केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते केंद्र गुजरातला, अहमदाबादला घेऊन गेले, त्यावर आमचे खासदार काहीही बोलल्याचे ऐकिवात नाही.

* मुंबईतील सर्वात महत्त्वाचा रेल्वे किंवा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी आपली काय योजना आहे?

मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न बिकट आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी एक तर लोकल गाडय़ा वाढवाव्या लागतील. हा प्रश्न प्राधान्याने हाती घेणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट बेस्ट वाहतूक सेवा सक्षम करावी लागेल. मुंबईतील सर्वसामान्य जनतेसाठी लोकल व बेस्ट ही दोन प्रमुख वाहतुकीची साधने आहेत. त्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागेल. काँग्रेस सरकारच्या काळात जवाहरलाल नेहरू नागरी विकास योजनेंतर्गत बेस्टला नवीन बसेस दिल्या होत्या. अशा योजनांच्या माध्यमातून मुंबईतील बेस्ट सेवा अधिक चांगली करावी लागेल.

* तुम्हाला लोकांनी मते का द्यावीत?

सध्याच्या परिस्थितीत लोकांचे जीवन-मरणाचे प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी हे सरकार काहीच प्रयत्न करीत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी इतर गैरलागू प्रश्नांवर बोलतात. राष्ट्रभक्ती हा काय प्रश्न आहे? संपूर्ण देशच राष्ट्रभक्त आहे, पण त्यावरच सातत्याने बोलायचे. हा देश लोकशाहीप्रमाणे चालला पाहिजे, त्याला उत्तेजन दिले पाहिजे, ही माझी भूमिका आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे रोजगार-व्यवसाय बुडाले, त्यांना वर काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार आहे. उद्योग, व्यवसाय यांना पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यायची आहे. मुंबईतील लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही, किंबहुना पुरेसे पाणीच मिळत नाही. असे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. घरे, पाणी, रस्ते, वाहतूक हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण झटणार आहे. त्यासाठी मला निवडून द्यावे, असे माझे मतदारांना आवाहन आहे.

* पुढील पाच वर्षांत आपण कोणती कामे करणार आहात?

माझ्या मतदारसंघात ७० टक्के झोपडपट्टी आहे. राहुल गांधी यांनी  झोपडपट्टीवासीयांना ५०० चौरस फुटांची घरे देण्याचे आश्वासन दिले आहे. जुन्या चाळी, पीएमजीच्या काही इमारती आहेत. त्यांतील रहिवाशांना ५०० फुटांची घरे मिळावीत यासाठी प्रयत्न करणार आहे.  पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन योजना तयार करावी लागेल. मुंबईत वाहतूक, कचरा डेपो व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर मार्ग काढावा लागेल आणि हा विषय माझ्या प्राधान्यक्रमावर राहील. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. युवकांना लहान-मोठे व्यवसाय, उद्योग करण्यासाठी विनातारण कर्ज आणि तीन वर्षांपर्यंत कोणतीही परवानगी घ्यायची नाही, अशी आमची योजना आहे. याचा अर्थ नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्याला पहिली तीन वर्षे कुठलाही कर लागणार नाही. त्यातून अनेकांना रोजगार मिळेल. मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्यामागे हाच उद्देश होता, त्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न केले जातील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 1:02 am

Web Title: large scale works in the constituency
Next Stories
1 थकीत कर्जाचा तपशील माहिती अधिकार कक्षेत!
2 बेरोजगारी दर आणखी वाढला
3 नऊ हजार मतदारांवर फुली
Just Now!
X