देशभरात सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील एकूण ५९ जागांसाठी आज (दि.१२) मतदान पार पडले. यामध्ये संध्याकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण ६३.४३ टक्के मतदान झाले. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवरही सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक ८०.३५ टक्के मतदानाची नोंद झाली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या ५९ जागांपैकी ४५ जागा एकट्या भाजपाने जिंकल्या होत्या. तर त्यांचा मित्रपक्ष लोक जनशक्ती पार्टीने १ जागा मिळवली होती. तसेच उर्वरित जागांपैकी तृणमुल काँग्रेसला ८, काँग्रेस-आयएनएलडी यांना प्रत्येकी २ तर समाजवादी पार्टीला एका जागेवर विजय मिळवता आला होता.

सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान पश्चिम बंगालमध्ये विविध ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. एका भाजपा उमेदवाराच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता यामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचेही वृत्त होते. मात्र, देशातील इतर ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. या टप्प्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, भोपाळच्या भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, संध्याकाळी सात वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सहाव्या टप्प्यात एकूण ६३.४३ टक्के मतदान, प. बंगालमध्ये ८०.३५ टक्के, दिल्लीत ५९.७४ टक्के, हरयाणात ६८.१७ टक्के, उत्तर प्रदेशात ५४.७२ टक्के, बिहारमध्ये ५९.२९ टक्के, झारखंडमध्ये ६४.५० तर मध्य प्रदेशात ६४.५५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.