शेवटच्या टप्प्यातील लढती रंगतदार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात १७ मतदारसंघांमध्ये लक्षवेधी लढती होणार आहे. सध्या सर्व मतदारसंघांमध्ये युतीचे खासदार आहेत.  या जागा कायम राखण्याचे  आव्हान आहे.

राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये  २९ एप्रिलला   मतदान होणार आहे. यात मुंबई-ठाण्यातील दहा, उत्तर महाराष्ट्रातील चार आणि मावळ, शिरुर आणि शिर्डी मतदारसंघांचा समावेश आहे.  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, पूनम महाजन, प्रिया दत्त, पार्थ पवार, अमोल कोल्हे आदी वलयांकित उमेदवारांमुळे या लढती लक्षवेधी ठरल्या आहेत.

गत वेळी मुंबई-ठाण्यातील सर्व दहा मतदारसंघांत विजय मिळविला होता.  राज्याच्या ग्रामीण भागांत शिवसेनेसाठी निवडणूक कठीण गेल्याचे मानले जाते. या पाश्र्वभूमीवर मुंबई, ठाण्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या युतीच्या विजयासाठी सर्वत्र दौरे करीत आहेत.

१७ पैकी १५ खासदार रिंगणात

या १७ पैकी १५  मतदारसंघात युतीचे विद्यमान खासदार मैदानात आहेत. त्यात भाजपच्या सहा तर  व शिवसेनेच्या नऊ खासदारांचा समावेश आहे.

उत्तर मुंबईतील भाजपचे गोपाळ शेट्टी विरुद्ध काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर, उत्तर-मध्य मुंबईतील भाजपच्या पूनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त, दक्षिण मुंबईतील  शिवनसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यात अटीतटीचा सामना होत आहे.

मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादीचे पार्थ पवार आणि शिरुरमध्ये शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव – पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे या लढतीकडेही े लक्ष लागले आहे.

उत्तर महाराष्ट्रात चुरस

मंदुरबार मतदारसंघात भाजपच्या डॉ. हिना गावित आणि काँग्रेसचे अ‍ॅड. के. सी . पाडवी यांच्यात अटीतटीचा सामना आहे. धुळ्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांना काँग्रेसचे कुणाल पाटील यांनी आव्हान दिले आहे. दिंडोरीत भाजपच्या भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादीचे धनराज महाले यांच्यातील  लढाई प्रतिष्ठेची मानली जात आहे. माकपचे जे.पी. गावित हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांच्याशी सामना आहे. भाजपचे माणिकारव कोकाटे यांनी बंडखोरी केली आहे. पालघरमध्ये शिवसेनेचे राजेंद्र गावित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात लढत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे दुसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्याशी होत आहे. ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे व राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात अटीतटीचा सामना आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे सदाशिव लोखंडे आणि काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांच्यात लढत आहे. शिवसेनेचे भाऊसाहेब वाघचौरे यांनी बंडखोरी केली आहे.