भोपाळ : लोकसभा निवडणुकीत स्वत:च्या पारंपरिक राजगढ मतदारसंघातून लढण्याची माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांची इच्छा होती, पण मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भोपाळ, इंदौर किंवा जबलपूर यापैकी एका मतदारसंघाची निवड करावी, अशी गळ घातली. काँग्रेस पक्षाने भोपाळमधून उमेदवारी जाहीर केली. इच्छा नसतानाही बळेबळेच भोपाळमधून सिंग यांना लढावे लागत आहे.

दिग्विजय सिंग यांनी भोपाळचे आव्हान स्वीकारले असले तरी १९८४ नंतर या मतदारसंघात काँग्रेसला कधीच विजय मिळालेला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोपाळ लोकसभा मतदारसंघातील आठपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. यापैकी दोन आमदार हे मुस्लीम समाजाचे आहेत. मुस्लीम मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या या मतदारसंघात दिग्विजय सिंग यांची जादू चालते का, हा खरा प्रश्न आहे. अल्पसंख्याकांचे लांगूनचालन केल्याबद्दल दिग्विजय सिंग यांना अनेकदा विरोधकांच्या टीकेचे धनी व्हावे लागले होते.

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात चढाओढ सुरू असताना दिग्विजय सिंग यांनी कमलनाथ यांच्या पारडय़ात वजन टाकले होते. भोपाळमध्ये सिंग हे उमेदवार असल्यास चुरस वाढेल हे ओळखूनच कमलनाथ यांनी दिग्विजय सिंग यांना रिंगणात उतरविले आहे. भोपाळची जागा भाजपसाठी तशी एकतर्फी असायची. पण दिग्विजय सिंग यांच्या उमेदवारीमुळे भाजप नेते सावध झाले आहेत. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना भोपाळमधून रिंगणात उतरविण्याची योजना आहे. तसे झाल्यास दिग्विजय सिंग विरुद्ध शिवराजसिंह चौहान अशी दोन माजी मुख्यमंत्र्यांतील देशातील चुरशीची लढत होऊ शकते.

शिवराजसिंग चौहान हे उमेदवार असले तरी या मतदारसंघात दिग्विजय सिंग हेच निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे. पक्षाने उमेदवारी गळ्यात टाकली असली तरी दिग्विजय सिंग यांच्यासमोर आव्हान सोपे नाही.