लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ‘एअर स्ट्राईक’ केला होता. निवडणुकीच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करत ‘मिशन शक्ती’च्या यशाची बातमी दिली होती. संपूर्ण जगभरात अंतराळात उपस्थित असलेले सॅटेलाईट पाडण्याची क्षमता असलेला भारत हा चौथा देश असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, या सर्वांचा मोदी सरकारला फायदा होताना दिसत नाही.

एबीपी न्यूज-सी व्होटरने मार्च महिन्याचा पहिला आठवडा ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपूर्ण देशातील ५४३ जागांवर केलेल्या सर्वेक्षणातून ही गोष्ट समोर आली आहे. यात एनडीए बहुमतापासून दूर दिसत आहे. एनडीएला २६७ जागा मिळणार असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. मागील वेळेच्या तुलनेत ६९ जागा कमी आहेत. मागील वेळी भाजपाने एकट्याने २८२ जागांवर विजय मिळवला होता. तर यूपीएला २०१९ मध्ये १४२ जागा मिळताना दिसत आहे. १३४ जागा इतर पक्षांच्या खात्यात जाताना दिसत आहे. ४२ टक्के मते ही एनडीएला, ३१ टक्के यूपीए आणि २७ टक्के ते इतरांना मिळताना दिसत आहे.

महाराष्ट्रात ४८ जागा असून एकीकडे भाजपा आणि शिवसेना युती तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. या दोघांमध्येच प्रमुख लढत होत आहे. महाराष्ट्रात एनडीएला ३५ तर यूपीएला १३ जागा मिळण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये एनडीए आणि महाआघाडी दोघांना ४३-४३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. पण जागांच्या बाबतीत महाआघाडी (सपा-बसपा-रालोद) बाजी मारू शकतात. एनडीएला ३२ तर महाआघाडीला ४४ जागा मिळू शकतात. तर यूपीए १३ टक्के मतांसह ४ जागांवर मिळवू शकतात. बिहारमध्ये एनडीएला (भाजपा, जदयू, लोजपा) मोठा फायदा होताना दिसत आहे. येथील ४० जागांपैकी ३४ वर एनडीए आणि ६ जागांवर यूपीए विजयी होताना दिसत आहे. बिहारमध्ये यूपीएमध्ये काँग्रेस, राजद, हिंदुस्तानी आवाम मोर्चा, रालोसपा आणि हम पक्षाचा समावेश आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची जादू कायम असल्याचे दिसत आहे. राज्यातील ४२ जागांपैकी ३५ टीमएसी, ६ एनडीए आणि १ यूपीएला मिळताना दिसत आहे. ओडिशामधील एकूण २१ जागांपैकी १२ एनडीए आणि ९ बिजू जनता दलच्या खात्यात जाताना दिसत आहे. झारखंडमध्ये भाजपाचे सरकार असूनही येथे यूपीएचे पारडे जड असताना दिसत आहे. राज्यातील एकूण १४ जागांपैकी ९ यूपीए आणि ५ जागा एनडीएला मिळण्याची शक्यता आहे.