बेगुसरायमध्ये चुरशीची तिरंगी लढत

पाटणा : नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) घोषणाबाजीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार हे बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून नशीब आजमावित असून, भाजप आणि राष्ट्रीय जनता दल अशा तिरंगी लढतीत विजय मिळविण्याचे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.

बेगुसराय मतदारसंघात भाजपचे उमेदवार अणि केंद्रीय गिरीराज सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैयाकुमार यांच्यात तिरंगी लढत होत आहे. भाजपने गिरीराज सिंग यांना मतदारसंघ बदलून बेगुसरायमध्ये पाठविल्याने ते सुरुवातीला नाराज होते. पण नंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची नाराजी दूर केली आणि ते लढण्यास तयार झाले. कन्हैयाकुमार हे रिंगणात असल्याने बेगुसराय मतदारसंघाकडे राष्ट्रीय पातळीवरील माध्यमे आणि राजकीय तज्ज्ञांचे लक्ष गेले आहे.

तीन वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला होता. या वादात कन्हैयाकुमार, शेहला रशीद, उमर खालिद हे नवे नेतृत्व उदयाला आले. यापैकी कन्हैयाकुमार हा आपले मूळ गाव बेगुसरायमधून निवडणूक लढवीत आहे. शेहला रशीद जम्मू आणि काश्मीरमध्ये राजकीयदृष्टय़ा सक्रिय झाली आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादामुळे ३२ वर्षीय कन्हैयाकुमार हा राष्ट्रीय पातळीवर चमकला. तरुण वयात पुढे आलेले नेतृत्व भविष्यात आपल्याला त्रासदायक ठरेल या भावनेतूनच त्यांचा राजकीय काटा काढण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न झाले आहेत. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेससह विविध पक्षांची महाआघाडी बिहारमध्ये झाली आहे. बेगुसराय मतदारसंघ कन्हैयाकुमार यांच्यासाठी सोडावा, असा प्रयत्न झाला.

विरोधकांचा जागा सोडण्यास नकार

काँग्रेस आणि डावे पक्षांची तशी मागणी होती. पण लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांनी हा मतदारसंघ कन्हैया यांच्यासाठी सोडण्यास नकार दिला. तसेच या मतदारसंघात मुस्लीम उमेदवार उभा केला आहे. कन्हैयाकुमार निवडून आला आणि राष्ट्रीय पातळीवर अधिक चमकल्यास आपल्या नेतृत्वाला आव्हान मिळेल, असा विचार तेजस्वी यांनी केल्याची चर्चा आहे.

मतदारसंघाचे गणित

गिरीराज सिंह आणि कन्हैयाकुमार हे दोघेही भूमिहार आहेत. या मतदारसंघात २३ टक्के मतदार हे भूमिहार समाजाचे मतदार असून या मतांचे विभाजन होणार आहे. गेल्या निवडणुकीत राजदच्या तन्वीर हसन यांना तीन लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती. मुस्लीम मते ही कन्हैयाकुमार आणि तन्वीर यांच्यात विभागली जाणार आहेत. याचाच भाजपला फायदा होऊ शकतो. लालू पुत्राने समजूतदारपणा दाखविला असता तर कन्हैयाच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकला असता. या मतदारसंघात एकेकाळी डाव्यांचे प्राबल्य होते. पण १९९०च्या दशकापासून डाव्यांच्या वर्चस्वाला ओहोटी लागली. गेल्या निवडणुकीत भाजपला (३९.७२ टक्के), राजदला (३४.३१ टक्के) तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला १७.८७ टक्के मते मिळाली होती.