ईव्हीएमवरुन विरोधक आक्रमक झाले असतानाच मतमोजणी दरम्यान हिंसाचार होण्याची भीती गृह मंत्रालयाला आहे.  त्यामुळे सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सुचना गृह मंत्रलयाकडून देण्यात आल्या आहेत. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

देशाच्या निरनिराळ्या गटांनी हिंसाचाराला चिथावणी देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागांत हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन दक्ष राहावे, अशी सूचना मतमोजणीच्या एक दिवस आधी केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केली.कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता राखण्याबाबत आपण राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांना सांगितले असल्याचे मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले. गुरुवारी होणाऱ्या मतदानाच्या संदर्भात देशाच्या निरनिराळ्या भागांत हिंसाचार उसळण्याच्या शक्यतेबाबत गृहमंत्रालयाने राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना खबरदारीचा इशारा दिला असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

एग्झिट पोलचे आकडे आल्यानंतर विरोधक ईव्हीएमवरून आक्रमक झाले होते. गुरूवारी काही व्यक्तींकडून हिंसेला प्रोत्साहन देणारी भडकावू विधानं केली जाऊ शकतात. त्यामुळे मतमोजणी केंद्रं आणि ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळील सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचनादेखील गृह मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.

ईव्हीएमशी छेडछाड झाल्यास रक्तपात होईल, असं भडकाऊ वक्तव्य बिहारमधील उपेंद्र कुशवाह यांनी मंगळवारी केलं होते. एवढचं नव्हे तर गरज पडल्यास शस्त्रही उचलू, असंही ते म्हणाले होते. यामुळे काही ठिकाणी परिस्थिती तणावाची बनली आहे.