नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था १९९६च्या वाजपेयी सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं १३ किंवा १५ दिवसांत कोसळेल असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी भाकित वर्तवलं आहे. लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा १९ तारखेला होणार आहे. २३ तारखेला निकाल लागणार आहे. त्यापुर्वी सत्तास्थापनेसाठीची तयारी विरोधी पक्षानं सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे, या महासंग्रामाचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रात मोदी सरकारविरुद्ध मोर्चेबांधणी करण्यात आघाडीवर असलेल्या पवारांनी केलेल्या भाकिताने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपविरोधात सर्व पक्षांची मोट बांधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या २१ मेपर्यंत त्याचं प्रत्यक्ष स्वरूप तुमच्यापुढे येईल, असेही पवारांनी यावेली सांगितले.

यंदाचं सरकार त्रिशंकू नसेल, असा अंदाज शरद पवारांनी वर्तवला. भाजपच्या हातात सत्ता जाणार नाही. बाकीचे पक्ष एकत्र बसून स्थिर सरकार देतील, असेही पवार यावेळी म्हणाले.

पार्थनंतर रोहितही राजकारणात, पवारांचे संकेत
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी रोहित पवारांच्या राजकीय प्रवेशाचे संकेत दिले आहेत. शरद पवारांनी नातवासह पहिल्यांदाच एकत्रित मुलाखत दिली आहे. रोहित शिक्षण, शेतकरी या प्रश्नाबाबत लक्ष देतात. शेतकऱ्यांशी रोहितचा संपर्क आहे, अशा शब्दात पवारांनी नातवाचं कौतुक केलं.

७२ पेक्षा भयानक दुष्काळ –
१९७२ आणि १९७८ चा दुष्काळ मी जवळून पाहिला आहे. त्याच्या तुलनेत यंदाचा दुष्काळ भयावह आहे. तेव्हा पीक गेलं होतं, पाणी होतं. आता लोकांना पाणी हवं आहे. यावेळी दुष्काळाची तीव्रता अधिक आहे, असंही शरद पवारांना वाटतं. धान्याची किंमत वाढणार नाही, तेल आणि डाळींची किंमत वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाजही पवारांनी वर्तवला.

राज्यातही सत्ताबदल होणार –
केंद्राबरोबर राज्यात सत्ताबद्दल होणार, असं भाकित पवारांनी वर्तवलं आहे. भाजप-शिवसेनेच्या हातात सत्ता राहणार नाही. सरकारविरोधात संतप्त जनमत असल्याचं निरीक्षण पवारांनी बोलून दाखवलं. विधानसभेला युती होणार, त्यांना पर्याय नाही, असं सांगतानाच ‘एकाला नवरा मिळत नाही, एकाला बायको मिळत नाही’ अशी म्हणही पवारांनी बोलून दाखवली.