पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल कोलकात्यामध्ये भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो मध्ये झालेल्या हिंसाचारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. गुंड बाहेरुन आणले होते. त्यांनी भगवी वस्त्रे परिधान करुन हिंसाचार केला. बाबरी मशीद पाडताना झालेल्या हिंसाचारासारखा हा प्रकार होता अशा शब्दात त्यांनी टीका केली.

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचाराचा कालावधी २० तासांनी कमी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी ममता बॅनर्जी यांनी भाजपाला जबाबदार धरले आहे. असा निवडणूक आयोग मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही. प्रचाराचा कालावधी कमी करण्याचा निर्णय हा एक अनैतिक आणि राजकीय पक्षपातीपणा करणारा निर्णय आहे. पंतप्रधान मोदींना त्यांच्या दोन सभा पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिला अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर टीका केली.

प्रचार कालावधी कमी करण्याचा निर्णय अनपेक्षित होता. भाजपा निवडणूक आयोगाला चालवत आहे असा आरोप त्यांनी केला. अमित शाहंमुळे काल हिंसाचार झाला. निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस का बजावली नाही? असा सवाल त्यांनी केला.

अमित शाहांनी अन्याय केला. शिक्षा आम्हाला मिळाली. अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये अराजकता निर्माण केली. बंगालची जनता भाजपाला कधीही माफ करणार नाही. अमित शाह यांनी बंगाल आणि बंगाली माणसांचा अपमान केला. मुकुल रॉय यांनी सर्व कट रचला असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.