लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान राजस्थानमधील अलवरच्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून राजकारण तापले आहे. या प्रकरणी आपण गप्प का? अशी विचारणा करण्यात आल्यानंतर बसपा प्रमुख मायावतींनी देखील पंतप्रधान मोदींवर ऊना व रोहित वेमुला प्रकरणावरून निशाणा साधत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच, पंतप्रधान मोदींनी दलित महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचारावरून एवढे वाईट राजकारण करू नये असे म्हणत, भाजपाचे सरकार असलेल्या राज्यातील दलित अत्याचाराच्या घटनांमधील दोषींवरील कारवाईचे काय? अशी विचारणा केली.

पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे मायावतीवर निशाणा साधत, अलवर प्रकरणाच्या मुद्दयावरून आपण राजस्थान सरकारचा पाठिंबा का काढत नाहीत? अशी विचारणा केली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी अलवर येथे दलित महिलेवर झालेल्या सामुहिक अत्याचारावरून मायावतींना थेट लक्ष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, बसपाच्या मदतीने चालणा-या राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा पाठिंबा मायावतींनी तत्काळ काढून घेतला पाहिजे. यावर मायावती म्हणाल्या की, बसपाला हे चांगले माहित आहे की राजकीयदृष्ट्या काँग्रेसशी कसे वागायचे. केवळ राजस्थानातच नाही तर मध्य प्रदेशातही काँग्रेसला तोंड देण्याची सर्व तयारी झाली आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी एका दलित महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणावरून एवढे वाईट राजकारण करू नये.

भाजपने राजस्थानबरोबरच त्यांचे सरकार असलेल्या राज्यातील दलित अत्याचाराच्या घटनांचाही विचार करायला हवा, तेथील भाजपा सरकार अशा प्रकरणातील आरोपींवर का कठोर कारवाई करत नाही? असा सवालही मायावतींनी केला. शिवाय गुजरातमधील ऊना येथील दलित कांड ते रोहित वेमूला प्रकरणापर्यंतच्या मुद्यावरून मोदींवर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याचीही  मागणी केली.