बालाकोट एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांना देशद्रोही ठरवता. बालकोटमध्ये पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारले गेले नाहीत असे सुषमा स्वराज म्हणतात. मग सुषमा स्वराज देशभक्त की देशद्रोही ते भाजपाने सांगावं असा सवाल राज ठाकरेंनी केला. मोदी सरकारने वर्तमानपत्र, चॅनलची मुस्काटदाबी केली. हिटलरच्या मार्गाने मोदींचा प्रवास सुरु आहे. हिटलरने त्याचा अजेंडा चित्रपटातून दाखवला तेच मोदींचे सुरु आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह देशावरच संकट असून दूर झालं पाहिजे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेला मतदान करु नका असे राज यांनी आवाहन केले. भाजपा आणि शिवसेना एकमेकांच्यावर उरावर बसले होते मग युती कशी झाली?सत्ता आणि पैशासाठी शिवसेना-भाजपा लाचार आहेत अशी टीका राज यांनी केली. मोदींनी २८ हजार कोटी आरबीआयकडून घेतले. सरकारकडे पैसे नाहीत मग पाकिस्तान बरोबर युद्ध कुठल्या जीवावर करणार होता? असा सवाल त्यांनी केला.

श्रीदेवीच्या मृत्यूच्या वेळी नीरव मोदी देशाबाहेर पळाल्याच्या बातम्या दाबून टाकल्याचा आरोप त्यांनी भाजपावर केला. नोटाबंदीत ठराविक लोकांना लाभ करुन दिला. नोटाबंदीत भाजपाशी संबंधित लोकांना नोटा बदलून दिल्या. नोटाबंदीत भाजपाने लाभ करुन घेतला तोच पैसा निवडणुकीत वापरत आहेत या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. परदेशात २ हजार रुपयांच्या नोटा छापून भारतात आणल्या हा कपिल सिब्बल यांचा आरोप आहे. या कामासाठी आरबीआय आणि रॉ च्या अधिकाऱ्यांचा वापर करण्यात आला असा सिब्बल यांचा आरोप आहे. सिब्बल यांचा आरोप चुकीचा असेल तर भाजपा त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई का करत नाही? असा सवाल त्यांनी केला.