महाराष्ट्र नव निर्माण सेना अर्थात मनसे लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करणार या निर्णयावर आज राजगडावर झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. आज राजगडावर मनसे विभाग अध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत बाळा नांदगावकर यांनी या संदर्भातल्या स्पष्ट सूचना दिल्या. मनसे कार्यकर्त्यांनी उघडपणे शिवसेना आणि भाजपा विरोधात बिनधास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करावा असे नांदगावकर यांनी सांगितले.

मनसेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी आणि त्यानंतर झालेल्या भाषणात राज ठाकरेंनी आपली लढाई मोदींविरोधात आहे. शाह आणि मोदी यांना हटवण्यासाठी पक्ष कोणता ते पाहणार नाही. जे पक्ष मोदींचा विरोध करत आहेत त्यांना साथ देणार असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे.

काय म्हटले होते राज ठाकरे?
मोदी मुक्त भारत हेच माझे आणि माझ्या पक्षाचे धोरण आहे. मोदींच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे हे मागच्याच वर्षी बोललो होतो. आता जे पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत तेच पक्ष माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. मोदी विरोध हीच माझी भूमिका आहे. जे काही करायचं ते मोदी आणि भाजपाच्या विरोधात करायचं आहे. काहीही झाले तरीही भाजपाला, नरेंद्र मोदींना आणि अमित शाह यांना मतदान करू नका असंही आवाहन राज ठाकरेंनी केलं  होतं.

तसंच एअर स्ट्राईकबाबत धादांत खोटी माहिती पसरवली जाते आहे. खोट्या फोटोंच्या आधारे प्रचार केला जातो आहे आणि मतं मागितली जात आहेत. खोट्या प्रचाराला भुलू नका. नरेंद्र मोदी हा अत्यंत खोटारडा माणूस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका असंही राज ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यांच्या भाषणाच्या वेळी त्यांनी काही व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या आणि मोदींवर निशाणा साधला होता.