– नामदेव कुंभार

राज्यात चार टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. त्यापैकी १८ एप्रिल रोजी होणाऱ्या दुस-या टप्प्यामध्ये मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागांत मतदान होणार आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचार सभांमध्ये राजकीय पक्षांकडून शेतकरी, शेतीचे प्रश्न, कर्जमाफी, दुष्काळ, पाणी टंचाई आदी समस्या आणि त्यावरील उपाययोजनांवर भाष्य कमी, त्या ऐवजी सत्ताधारी-विरोधक यांच्या कार्यकाळातील कामांवरून आरोप प्रत्यारोप ऐकायला मिळत आहेत. भाजपाने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवरुनही सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. एकीकडे राजकीय नेते एकमेकांवर आरोप करत असतानाच अनेक शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. या शेतकऱ्यांपैकीच एक आहेत लातूरमधील भिसे वाघोली येथील गुरूलिंग मोदी. मोदी अद्याप कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. आम्हाला लवकरात लवकर कर्जमाफी मिळावी अशी मागणी मोदी यांनी केली आहे. कर्जमाफीची घोषणा होऊन जवळपास दीड वर्ष उलटल्यावरही कर्जमाफी मिळालेली नाही. त्यात यंदा पडलेला दुष्काळानं अडचणींत भर पडल्याचे मोदींने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितले.

‘खरिपाच्या गेल्या मोसमात सोयाबीन थोडंफार हाताशी लागलं, त्याला फक्त २७०० रुपयेच भाव मिळाला. आता पाण्याअभावी रब्बीची पेरणीही झालेली नाही. वेळेवर पाऊस पडत नाही त्यामुळे शेतात काही पिकत नाही. दुष्काळी परिस्थिती झाली आहे. सरकारनं कर्जमाफी दिली असती, आमचे प्रश्न सुटले असते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचाराचीही गरज पडली नसती’, असं मोदी म्हणतात. कर्जाखाली दबलेले शेतकरी अर्जाची शर्यत पार करूनही अद्याप कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. गुरूलिंग मोदी यांनीही कर्जमाफीसाठी ऑनलाईन प्रक्रिया पार पाडली आहेत. यासंदर्भात अद्याप त्यांना कोणतीही माहिती मिळाली नसून ते कर्जमाफीची प्रतिक्षा करत आहेत. गुरूलिंग मोदी यांनी चार वर्षांपूर्वी सोसायटीचं ८० हजारांचे पीककर्ज काढलं होतं. सरकारनं त्यांना ३८ हजार रूपयांची कर्जमाफी दिली आहे. मात्र बँकवाले अद्याप तुम्हाला कर्जमाफी पोहचली नाही असे सांगत असल्याचं मोदींनी सांगितले.

साडेचार एकर शेतीमध्ये गुरूलिंग मोदी यांनी सोयाबिनचं पिक घेतलं होतं. पेरणी केली तेव्हा तीन हजार क्विंटल रुपये भाव होता. आता २६०० आहे. ‘कसं काय कर्ज फिटायचं आता?,’ असा उद्विग्न सवाल मोदींनी केला आहे.  सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी गुरूलिंग मोदींने केली आहे. ‘सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी आमची इच्छा आहे. जर शेतमालाला भाव दिला तर शेतकरी एवढा अडचणीत येणार नाही, आत्महत्या करणार नाही,  दोन रूपये तरी त्याच्या खिशात राहतील. पण हे कधी? भाव दिला तरच हे शक्य आहे,’ असं मोदी म्हणतात.