लखनऊ : उत्तर प्रदेशातील काही मतदान केंद्रांवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना गुरुवारी ‘नमो फूडस्’ची अन्नपाकिटे दिली गेल्यावरून वाद उफाळला आहे. बहुजन समाज पक्षाने याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. या पाकिटांवर कोणतेही छायाचित्र नसले तरी त्यांचा रंग भगवा आहे. नोयडा सेक्टर १५ ए येथील मतदान केंद्रावर सकाळी साडेनऊ वाजता पोलीस कर्मचाऱ्यांना ही पाकिटे मिळाली तेव्हा येणाऱ्या जाणाऱ्या मतदारांना त्यांचे दर्शन घडत होते. त्यामुळेच विरोधकांनी जोरदार आक्षेप नोंदवला. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी एल. वेंकटेश्वरलु यांनी नंतर सांगितले की, ‘‘याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो असून या पाकिटांचा भाजपशी काही संबंध नाही. अन्न पुरवणाऱ्या कंपनीचे नावच ते आहे.’’ समाजवादी पक्षाचे सरचिटणीस एस. सी. मिश्रा म्हणाले की, भाजपचे नाव मतदारांच्या डोळ्यापुढे राहावे यासाठी ते  अशी क्लृप्ती वापरत आहेत.

नमो टीव्हीचे कार्यक्रम प्रमाणित नाहीत

दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला सांगितले की, नमो टीव्हीचे बोधचिन्ह आम्ही मंजूर केले, मात्र त्यावरील कार्यक्रम म्हणजे पंतप्रधानांची जुनीच भाषणे असल्याने ती प्रमाणित केलेली नाहीत. नमो टीव्ही हा भाजपच्या ‘नमो अ‍ॅप’चाच भाग असल्याचे पक्षाने कळवले आहे.