बागलकोट : केंद्रात मजबूत सरकार निवडून द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.  तुम्हाला मजबूत सरकार पाहायचे असेल, तर दिल्लीकडे पाहा आणि तुम्हाला मजबूर सरकार पाहायचे असेल, तर कर्नाटककडे पाहा, असे मोदी यांनी उत्तर कर्नाटकमधील एका निवडणूक प्रचारसभेत उद्देशून सांगितले.

काँग्रेसला ‘मजबूर’ सरकार हवे असल्याचे सांगून, मतदारांनी ‘मजबूर’ कुमारस्वामी यांच्याकडे पाहावे, असे मोदी म्हणाले. कुमारस्वामी यांना वारंवार भावनांचा उमाळा येत असल्याबद्दल उपहास करताना, हे ‘नाटक’ असल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर झालेले लक्ष्यभेदी हल्ले आणि बालाकोटचा हवाई हल्ला हा आपला विजय असल्याचे मान्य करण्यास काँग्रेस तयार नसल्याची टीका मोदी यांनी केली. काँग्रेस व त्याचे सहकारी पक्ष देशहिताचा नव्हे, तर स्वत:च्या हिताचा विचार करतात असेही ते म्हणाले.

बालाकोट कुठे आहे याचा विरोधकांनी गुगलवर शोध घेतला आणि हे ठिकाण भारताच्या हद्दीतच असल्याचे सांगितले. भारत पाकिस्तानच्या हद्दीत शिरून हल्ला करू शकतो यावर त्यांचा विश्वास बसू शकला नाही, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार रडत  फिरत होते, पण आता परिस्थिती बदलली आहे. आता पाकिस्तान जेथे जातो, तेथे मोदी आमच्यावर हल्ले करत असल्याची तक्रार करतो, असे मोदी म्हणाले.

पं. नेहरूंना कमी लेखण्यासाठी पटेलांचा पुतळा उभारला नाही!

अमरेली : माजी पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरू यांना कमी लेखण्यासाठी गुजरातमध्ये पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभा करण्यात आलेला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. सरदार पटेल हे आमचे नेते असल्याचा जप करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या एकाही नेत्याने आतापर्यंत या पुतळ्याला भेट दिलेली नाही, असेही मोदी येथील निवडणूक प्रचारसभेत म्हणाले. जगातील मोठय़ा पुतळ्याची माहिती गुगलवर शोधताना स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि गुजरातचे नाव समोर येते तेव्हा तुम्हाला अभिमान वाटत नाही का, असा सवालही मोदी यांनी या वेळी उपस्थितांना केला.