दरभंगा (बिहार) : निवडणूक प्रचारात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल विरोधी पक्ष करत असलेल्या टीकेचा समाचार घेताना, दहशतवादाचे उच्चाटन करणे गरिबी निर्मूलनासाठी आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले.

देशाच्या संरक्षणासाठी खर्च होणारा पैसा गरिबांच्या उत्थानासाठी अधिक चांगल्या रीतीने खर्च केला जाऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

काँग्रेसशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा, तसेच सत्तेवर आल्यास देशभरात ही उपाययोजना करण्याचे आश्वासन मोदी यांनी खोडून काढले. कर्जमाफीमुळे कुणाही गरीब दलित किंवा आदिवासीचा फायदा झालेला नसून, केवळ विरोधी पक्षांच्या चेल्याचपाटय़ांनी याचा फायदा घेतलेला असल्याचे ते म्हणाले.

अवघ्या २० ते ४० जागांवर किंवा कर्नाटकात तर केवळ आठ जागांवर निवडणूक लढवत असतानाही पंतप्रधानपदाची आकांक्षा बाळगणाऱ्या क्षेत्रीय सुभेदारांची पंतप्रधानांनी थट्टा उडवली. मोदी दहशतवादाबद्दल का बोलत असतात, असे ते (विरोधी पक्ष) विचारताच, हा काही मुद्दा नाही. राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवाद हे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे मतदारांना कळते, पण हे स्वार्थी राजवंशी लोक ही साधी गोष्ट समजण्यास असमर्थ आहेत, असे दरभंगा शहरातील प्रचार सभेत मोदी यांनी सांगितले.

श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात साडेतीनशेहून अधिक लोक ठार झाल्याचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले की, आपल्या शेजारी देशात दहशतवादाचे कारखाने सुरू आहेत, पण तरीही हा काही मुद्दा नाही असे म्हणण्याचे धाष्टर्य़ यांच्यात आहे.