|| महेश सरलष्कर
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारासाठी अयोध्येच्या नजीकच्या गावात आले पण, त्यांनी रामलल्ला भेट न दिल्याने अयोध्यावासी मोदींवर नाराज झाले आहेत. रामजन्मभूमी स्थळच्या परिसरात राम मंदिर उभारणीशी निगडित काही कार्यकर्त्यांची छोटी दुकाने आहेत. त्यांच्यापैकी काही जणांनी मोदींच्या अयोध्येला बगल देण्यावर नापसंती व्यक्त केली.
‘राम मंदिराच्या मुद्दय़ावर भाजपने मते मागितली. आता त्या मंदिराचे नावही मोदी घेत नाहीत. अयोध्येपासून २० किमीवर त्यांनी प्रचारसभा घेतली मग, त्यांच्यासाठी रामलल्लाचे दर्शन घेणे फार कठीण नव्हते,’ अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते. केंद्रात बहुमत असतानाही राम मंदिर उभे राहत नाही याची खंत अयोध्यावासी रामभक्तांना आहे. केंद्रातील भाजप सरकार नोटबंदी करू शकते. जीएसटी लागू करू शकते, मग राम मंदिरासाठी कायदा का करू शकत नाही, असा सवाल केला जात आहे. मोदींची एक मे रोजी रामपूरमाया या अयोध्येच्या सीमेवरील गावात प्रचारसभा झाली. ‘प्रभू रामजी की धरती से जय श्रीराम,’ असे मोदी या सभेत वारंवार म्हणाले. पण, मोदींनी त्यांच्या भाषणात राम मंदिर उभारणीवर भाष्य केले नाही. भाजपच्या यंदाच्या संकल्पनाम्यात मात्र राम मंदिराचा उल्लेख आहे. मोदी पाच वर्षांनी अयोध्येच्या परिसरात आले होते. त्यामुळे त्यांनी अयोध्येत यावे अशी अयोध्यावासींची भावना होती. फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार महेश तिवारी यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदींनी अयोध्येला भेट देण्याचे जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.
कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर या वादग्रस्त रामजन्मभूमीवर तात्पुरते छोटे मंदिर उभे आहे. या स्थळाभोवती असलेल्या कडेकोट बंदोबस्तात किमान एक किमीचा फेरा पार करून कथित रामजन्मभूमीचे दर्शन घेता येते. ही जागा वादग्रस्त असल्याने भक्तांना उभ्या केलेल्या उंच गजांआडून रामाची छोटी मूर्ती पाहता येते. परगावांहून आलेल्या रामभक्तांनी आपला राग पंतप्रधान मोदींवर काढला. ‘मोदींकडे इच्छशक्ती असती तर पाच वर्षांत केंद्र सरकारने राम मंदिर उभे केले असते. केंद्रात आणि राज्यात भाजपचीच सत्ता असतानाही राम मंदिर होत नसेल तर, भाजपला राम मंदिर बनवायचेच नाही असे दिसते,’ अशी कडवी प्रतिक्रिया रामलल्लाचे दर्शन घेऊन आलेल्या दोघांनी व्यक्त केली.
मोदींची पाठराखणही..
काहींना मात्र मोदींवर अयोध्येतून टीका होणे योग्य नाही, असे वाटते. ‘मोदींनी देशाचे नाव जगभरात मोठे केले आहे. त्यामुळे राम मंदिराचा प्रश्नही मोदींना सबुरीनेच हाताळावा लागत आहे. देशातील अल्पसंख्याकांवर दबाव टाकून राम मंदिर उभारले गेले अशी भावना इतर राष्ट्रांमध्ये निर्माण होऊ नये याची काळजी मोदी घेत आहेत. राम मंदिर उभारणीसाठी मुस्लीम राष्ट्रांचादेखील भारताला पाठिंबा मिळायला हवा. हे कठीण काम हळूहळू करावे लागेल,’ अशा शब्दांत अयोध्येतील दुकानदाराने मोदींची पाठराखण केली.