पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत सध्या सर्वत्र चर्चेत आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या या मुलाखतीत मोदींनी बालाकोट हवाई हल्ल्याच्या तयारीबाबत भाष्य केलं आहे. मात्र, या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या चांगलेच निशाण्यावर आले आहेत. ‘हल्ल्याआधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला होता’ अशाप्रकारचं विधान मोदींनी केलं आहे. त्यांच्या या विधानावरुन सर्वच विरोधक मोदींवर निशाणा साधत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही मोदींंना खरमरीत टोला लगावला असून फेसबुक पोस्टद्वारे खिल्ली उडवली आहे. ”मोदींजींच्या या शोधामुळे जगभरातले नागरी वैमानिक चिंतेत आहेत! येत्या जून महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यंत मान्सूनमुळे देशातील सगळ्या विमानसेवा बंद ठेवाव्या लागतील बहुदा!” अशाप्रकारची पोस्ट आव्हाड यांनी फेसबुकवर केली आहे.

काय म्हटलंय आव्हाड यांनी पोस्टमध्ये –
“ढगाळ वातावरणामुळे सर्जिकल स्ट्राईक नको म्हणणाऱ्या संरक्षण तज्ञांना मी सांगितले की ढगाळ वातावरणामुळे आपली विमाने रडारवर दिसणार नाहीत, आणि शत्रूला चुकवून परत येतील.”
– इति श्रीयुत मोदी

मोदींजींच्या या शोधामुळे जगभरातले नागरी वैमानिक चिंतेत आहेत! ढगात जर विमान रडारवर दिसलं नाही, किंवा रेडिओ तरंग तिथे पोचलेच नाहीत तर Air Traffic Controller त्यांना योग्य दिशा, उंची आणि बाकीची आवश्यक माहिती सांगणार कशी?

येत्या जून महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यंत मान्सूनमुळे देशातील सगळ्या विमानसेवा बंद ठेवाव्या लागतील बहुदा!

पण घाबरू नका! या सगळ्या प्रश्नांवर आजतकच्या अंजना ओम कश्यप (2000 च्या नोटेत चीप असणाऱ्या फेम) यांनी त्यांच्याकडील जमिनीखाली 200 फुटांवरच्या नोटा शोधणारी रडार भारत सरकारला देण्याचा वायदा केलेला आहे!”

डॉ.जितेंद्र.आव्हाड

काय म्हणालेत मोदी मुलाखतीत –
”मी 9 वाजता (हवाई हल्ल्याच्या तयारीबाबत) माहिती घेतली…त्यानंतर 12 वाजता पुन्हा माहिती घेतली. त्यावेळेस वातावरण अचानक खराब झालं होतं आणि ती आमच्यासमोरील मोठी समस्या होती…खूप पाऊस झाला…मी हैराण झालो, आतापर्यंत देशातील एवढे विद्वान लोक मला शिव्या घालतात, त्यांचं डोकं येथे चालत नाही. 12 वाजता…मी पहिल्यांदाच हे सांगतोय…एका क्षणासाठी आमच्या मनात आलं अशा खराब वातावरणात आपण काय करणार…ढग जातील की नाही…त्यावेळी तज्ज्ञ देखील हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात होते…त्यावेळी माझ्ा मनात दोन विचार डोकावले…एक गोपनियता….आतापर्यंत सर्व गोपनिय होतं… गोपनियतेत जर काही चूक झाली तर आम्हीच काही करु शकणार नव्हतो…दुसरा विचार माझ्या मनात आला…मला सर्व विज्ञान काही समजत नाही, पण ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडतोय याचा आपल्याला फायदाच होऊ शकतो असा विचार माझ्या मनात आला. आपण त्यांच्या रडारपासून वाचू शकतो काय…आकाशात जमा झालेल्या ढगांचा फायदा होऊ शकतो असा माझा विचार असल्याचं मी सांगितलं…सगळे बुचकळ्यात पडले…अखेरीस मी म्हटलं…ओके जा…नंतर ते निघाले”.