निलेश राणेंचा आरोप

रत्नागिरी : हातखंबा येथे घडलेला प्रकार म्हणजे आपल्या विरोधात रचलेला कट होता, असा संशय येथील लोकसभा निवडणुकीतील उमेदवार  निलेश राणे यांनी व्यक्त करत उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी आमदार उदय सामंत यांच्या इशा-यावरून आपल्याला खोटय़ा गुन्ह्यत गोवल्याचा आरोप केला आहे.

या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार नोंदवणार असल्याचे निलेश यांनी सांगितले.

रत्नागिरीपासून १३ किलोमीटर अंतरावर हातखंबा येथे गेल्या मंगळवारी मध्यरात्री पोलिसांकडून वाहनांची तपासणी चालू असताना तेथे आलेल्या निलेश राणे यांनी अश्लील शिवीगाळ करुन शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा इंगळे यांनी नोंदवला आहे.

या प्रकरणी गुरूवारी पत्रकार परिषदेत खुलासा करताना त्यांनी सांगितले की, राजापूरचा कार्यक्रम संपवून मी कार्यकर्त्यांसह रत्नागिरीत परत येत असताना हातखंबा तपासणी नाक्यावर पोलिसांनी थांबवले. गाडीतून बाहेर उतरून मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्यही केले. तेवढ्यात तेथे शिवसेनेचा कार्यकर्ता बाबू म्हाप तेथे येऊन माझ्या गाडीमध्ये डोकावून पाहू लागले. त्यामुळे संशयावरून त्यांना मी हटकले. यावेळी त्यांच्याशी बाचाबाची झाली. त्यांना समजेल अशा भाषेत मी बोललो,  हे खरे आहे. पण तेथे उपस्थित कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला मी अजिबात असभ्य भाषेत बोललो नाही. केवळ येथे सत्तेचा दुरूपयोग केला जात असल्याची नाराजी व्यक्त केली.  तरीही   उपविभागीय पोलिस अधिकारी इंगळे यांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर  आमदार सामंत यांचे वडील आर. डी. सामंत व त्यांच्या चालकाची तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस  अधिकाऱ्याबरोबर बाचाबाची झाली. त्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली नाही. मात्र हातखंबा येथील घटनेमध्ये खोटा  गुन्हा नोंदवण्यात आला, याबद्दलही निलेश यांनी आश्चर्य व्यक्त केले.

बाबू म्हाप यांचा बेकायदेशीर दारूधंदा आपण बंद पाडला होता. तसेच नगर परिषदेतील  शिवसेनेच्या गैरकारभाराबाबतही वेळोवेळी आवाज उठवत राहिलो, म्हणून आख्खी शिवसेना आपल्याला कुठेतरी अडकवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असाही आरोप राणे यांनी केला.

खंबाटाप्रकरणी दमानियांनी  पुरावे द्यावेत

सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी, मुंबईतील खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कामगारांच्या प्रश्नांवर  काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. या  कामगारांच्या वाताहतीला येथील लोकसभा निवडणुकीतील उमेदवार विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांचे कुटुंबीय, हे दोघेही जबाबदार असल्यामुळे त्यांना मते देऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले. निलेश यांनी हे आरोप फेटाळून लावत, आमच्याशी संबंधित कोणा व्यक्तीला खंबाटा कंपनीकडून दरमहा वेतन मिळत असल्याचे कागदोपत्री पुराव्यानिशी सिद्ध केले तर काढून टाकू, असे प्रतिआव्हान दिले.