भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन धनंजय मुंडे यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे.
मुंबईला वाचवताना आमच्या शहीदांनी प्राणांची आहुती दिली आहे. साध्वी प्रज्ञासिंहसारख्या ‘घरच्या भेदीं’नी तर शहीद हेमंत करकरेंबाबत बोलूच नये. भाजप हे सगळं सहनच कसं करतं? यांना लाज कशी वाटत नाही? खरतरं भाजप सरकारच आमच्या जनतेला लागलेलं सुतक आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपावर टीका केली.
मुंबईला वाचवताना आमच्या शहीदांनी प्राणांची आहुती दिली आहे. साध्वी प्रज्ञासिंहसारख्या 'घरच्या भेदीं'नी तर शहीद हेमंत करकरेंबाबत बोलूच नये. भाजप हे सगळं सहनच कसं करतं? यांना लाज कशी वाटत नाही? खरतरं भाजप सरकारच आमच्या जनतेला लागलेलं सुतक आहे.#HemantKarkare
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 19, 2019
दरम्यान साध्वींच्या वक्तव्यावरुन भाजपाने आपले हात वर केले आहेत. भाजपाने एक पत्रक प्रसिद्ध करुन साध्वी प्रज्ञा यांच्या विधानाशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर
गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञा यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. “तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही”, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला.
हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. यावर मी म्हटलं की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान साध्वींनी केले
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 19, 2019 7:41 pm