पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१२ एप्रिल, शुक्रवार) राज्यातील अहमदनगर येथे जाहीर सभा घेतली. युतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी ही सभा घेतली. या सभेसाठी सकाळपासूनच गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना काळे कपडे घालून सभेच्या मैदानात प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. मैदानात प्रवेश करायचा असल्यास काळे कपडे काढण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. त्यामुळे अनेकांना त्यांनी घातलेल्या काळ्या रंगाच्या बिनियान आणि सॉक्स काढल्यानंतरच मैदानात प्रवेश देण्यात आल्याचे वृत्त वाहिनीने म्हटले आहे.

सावेडी उपनगरातील निरंकारी भवनाच्या पाठीमागील मैदानात मोदींची ही प्रचारसभा पार पडली. या सभेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मैदानात जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात होती. काळा रंगाचे कपडे असणाऱ्यांना ते काढण्यास सांगितले जात होते असं एका वृत्तवाहिनेने म्हटलं आहे. या आधीही अनेकदा मोदींच्या सभेच्या ठिकाणी नागरिकांना काळे कपडे घालून जाण्यास मज्जाव करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. २०१८ साली सप्टेंबर महिन्यात भोपाळमध्ये झालेल्या सभेतही अशाच प्रकारे लोकांना काळे कपडे घालून मोदींच्या सभेच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. काही दिवसापूर्वी कानपूर येथे झालेल्या सभेमध्येही हाच नियम लागू करण्यात आला होता.

मोदींच्या या सभेसाठी दोन हजारांहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला. सात अतिरिक्त पोलिस अधीक्षक, तेरा पोलिस उपअधीक्षक, दोनशे पोलिस अधिकारी, तीन शिघ्र कृती दलाच्या तुकड्या, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, एक हजार ९०० पोलिस कर्मचारी व महिला पोलिस असा बंदोबस्त नियुक्त करण्यात आले होते. सभा असलेल्या मैदानाच्या परिसरातील अंतर्गत रस्ते आठ तास बंद ठेवण्यात आले आहेत. महामार्गावरील वाहतूक वाहनांचा ताफा येताना व जाताना काही काळ थांबविण्यात आला होता.

प्रतिष्ठेची निवडणूक

अहमदनगरमध्ये पक्षाने सुजय विखे-पाटलांनी दिलेले उमेदवारी सुरुवातीपासूनच चर्चेत आहेत. त्यातच मोदी प्रचारसभा घेणार असल्याने या मतदारसंघाला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा समाना नगरमध्ये रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मोदींच्या सभेचे आय़ोजन करण्यात आले. पंतप्रधान मोदींबरोबरच यासभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी थेट भाजपचाच झेंडा खांद्यावर देत राष्ट्रवादीला आव्हान दिल्याने राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जगताप यांना उमेदावरी देत राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार ठरणार आहे. मोदींची ही सभा भाजपासाठी फायद्याची ठरेल अशी चर्चा सध्या आहे.