लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाषण करताना शहिद जवानांचे फोटो मागे लावताना लाज वाटत नाही का? असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पुलवामा येथे जे जवान शहीद झाले त्यानंतर बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला. मात्र नरेंद्र मोदी हे आता शहीद जवानांच्या नावे मतं मागत आहेत. एअर स्ट्राईक करणारे जवान काय निवडणुकीला उभे आहेत का? असा खोचक प्रश्न विचारत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.

या देशाने तुमच्यावर विश्वास दाखवला पण तुम्ही या देशाचा विश्वासघात केला असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. नांदेडमध्ये आज राज ठाकरेंची प्रचारसभा पार पडली. या सभेत मोदींच्या भाषणांचे काही अंश सादर करत पुन्हा एकदा राज ठाकरेंनी मोदी आणि अमित शाह या दोघांविरोधात भूमिका घेतली. मी कुणाचाही प्रचार करायला आलेलो नाही माझ्या मनात जो राग आहे त्या रागातून मी जनतेसमोर आलो आहे असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यात काहीही ताळमेळ नाही याचे उदाहरण देताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदींच्या भाषणातील दोन अंश सादर केले. पहिल्या भाषणात मोदी म्हणत होते की नोटाबंदीनंतर माझ्या जिवाला धोका आहे आणि नंतर आता मोदी म्हणत आहेत तुमचा देश सुरक्षित हातांमध्ये आहे. मोदींना नेमकं म्हणायचं काय हेच कळत नाही ते स्वतःच संभ्रमात आहेत असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. राज ठाकरे एकूण 8 ते 9 सभा घेणार आहेत. मोदी आणि अमित शाह यांना हटवा हीच माझी भूमिका आहे याचाही पुनरूच्चार आज राज ठाकरेंनी केला.