आचारसंहिता भंगाच्या आणखी दोन प्रकरणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाकडून क्लिन चिट देण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ एप्रिल रोजी भाषण केलं होतं. यामध्ये त्यांनी आचारसंहितेचा भंग केला अशी तक्रार करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाने हा आरोप फेटाळून लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या प्रकरणात काहीही दोष नाही असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

तर दुसरी तक्रार काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली होती. वाराणसीमध्ये झालेल्या भाषणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं होतं. तसेच एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी आचारसंहितेचा भंग केला असंही सुरजेवालांनी म्हटलं होतं. मात्र या प्रकरणातही मोदी दोषी नाहीत असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृ्त्त दिले आहे.

दरम्यान याआधीही निवडणूक आयोगाने दोन तक्रारींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना निर्दोष ठरवले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान आणि बालाकोटमध्ये हल्ला करणाऱ्या हवाई दलासाठी तुमचे पहिले मत समर्पित कराल का’, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांना उद्देशून ९ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील प्रचारसभेत केले होते. यासंदर्भात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल झाली होती. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल, आचारसंहितेबाबतची मार्गदर्शक तत्त्वे आणि आदर्श आचारसंहितेतील तरतुदी आदींची सखोल पडताळणी करण्यात आली. त्यात आचारसंहिता उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आलेले नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. आता याचसोबत आणखी दोन प्रकरणांचीही चौकशी आणि पडताळणी करून मोदींनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.