लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसीतून कडवी झुंज देतील अशी चर्चा सुरु असतानाच काँग्रेसने अजय राव यांचं नाव जाहीर केल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. याआधी प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून उमेदवारी दिली जाईल याची दाट शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान प्रियंका गांधी यांनी आपण उमेदवारी का घेतली नाही याबद्दल माहिती दिली आहे.

प्रियंका गांधी यांनी सांगितलं आहे की, ‘मी पक्षातील वरिष्ठ नेते तसंच उत्तर प्रदेशातील माझ्या सहकाऱ्यांचा सल्ला घेतली. त्यांनी अत्यंत स्पष्टपणे माझ्यावर येथील ४१ जागांची जबाबदारी असल्याचं सांगितलं. जर मी एकाच ठिकाणी लक्ष केंदित केलं नाही तर कदाचित येथील उमेदवार नाराज होतील असं मला वाटलं’.

काँग्रेसने वाराणसीतून अजय राय यांना उमेदवारी दिली असून अजय राय हे २०१४ मध्येही मोदींविरोधात रिंगणात उतरले होते. सोनिया गांधी यांची कन्या आणि राहुल गांधी यांची बहीण म्हणून अमेठी व रायबरेली या मतदारसंघांमध्ये प्रियंका गांधी यांनी आजवर काँग्रेसचा प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेश पूर्व म्हणजेच पूर्वांचलमध्ये त्या काँग्रेसच्या महासचिव आहेत. विशेष म्हणजे पूर्वांचलमधून नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे देखील निवडून येतात.

काँग्रेस प्रियंका गांधी यांना थेट मोदींविरोधात उमेदवारी देणार, अशी चर्चा रंगली होती. मार्च महिन्यात प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचा दौरा केला होता. त्यावेळी प्रियंका गांधी यांनी सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी विनंती काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. यावर प्रियंका गांधी यांनी ‘वाराणसीतून निवडणूक का लढवू नये?’ असा प्रतिप्रश्न केला आणि या चर्चेला बळ मिळाले होते. उमेदवारीचा निर्णय राहुल गांधीच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

अखेर काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आणि वाराणसीतून अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मोदी विरुद्ध प्रियंका या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. अजय राय हे भूमिहार समाजातील नेते आहेत. २०१४ मधील निवडणुकीत वाराणसीत नरेंद्र मोदी, अजय राय आणि अरविंद केजरीवाल अशी तिरंगी लढत होती. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी तीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.