पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी २१ फेऱ्या होणार असून दुपारी चापर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. मात्र, यंदा प्रथमच व्हीव्हीपॅटमधील (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) चिठ्ठय़ांची मोजणी होणार असल्याने अंतिम आकडेवारीसह प्रशासनाकडून निकाल जाहीर होण्यास थोडा अधिक कालावधी लागणार आहे.

पुणे जिल्ह्य़ातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघांसाठी येत्या गुरुवारी (२३ मे) मतमोजणी होणार आहे. पुणे, बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य गोदाम, तर मावळ आणि शिरूरची मतमोजणी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे.

मतमोजणीच्या तयारीबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, पुणे मतदारसंघाच्या मतमोजणीच्या २१, बारामतीच्या २२, मावळच्या २५ आणि शिरूरच्या २७ फेऱ्या होणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या रायगड जिल्ह्य़ातील पनवेल, कर्जत आणि उरण या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमधील मतमोजणी देखील बालेवाडी येथेच होणार आहे.

मावळच्या मतमोजणीसाठी १०० टेबल, शिरूरसाठी ८४, पुण्यासाठी ९६ आणि बारामतीच्या मतमोजणीसाठी १०६ टेबल असतील. पुण्यात एक हजार ९९७, बारामतीमध्ये दोन हजार ३७२, मावळमध्ये दोन हजार ५०४ आणि शिरूरमध्ये दोन हजार २९६ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदारसंघांच्या मतमोजणीची एक फेरी पूर्ण होण्यासाठी ३५ ते ४० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आणि शहर पोलीस विशेष शाखेचे उपआयुक्त मितेश घट्टे या वेळी उपस्थित होते.

मतमोजणी आठ वाजता सुरू  होणार

सकाळी सात वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्रे ठेवण्यात आलेली खोली उघडण्यात येणार असून, सर्व प्रक्रिया पूर्ण करून सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला टपाली आणि सरकारी सेवेनिमित्त मतदारसंघाच्या बाहेर कर्तव्यावर असलेले लष्करी, निमलष्करी, केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांमधील जवानांसाठी असलेली इटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) ही मते मोजली जाणार आहेत. त्यानंतर मतदान यंत्रांमधील मते मोजली जाणार असून, सर्वात शेवटी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच याप्रमाणे ३० मतदान केंद्रांतील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठय़ांची मोजणी करण्यात येणार आहे.

फेरमतदानासाठी अर्ज करावा लागणार

मतमोजणी सुरू असताना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी फेरमतदानाची मागणी केल्यास त्यांना संबंधित लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे रितसर अर्ज करावा लागणार आहे. मात्र, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर गोंधळ, समस्या आली असल्यास आणि मतमोजणीच्या वेळेला दोन उमेदवारांच्या मतदानांमध्ये खूप जास्त किंवा खूप कमी फरक असल्यास अपवादात्मक परिस्थितीमध्ये फेरमतदान होणार आहे. पुण्यासह इतर तिन्ही मतदारसंघांत अशी परिस्थिती नसल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले. तसेच व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्रांमधील मते तपासत असताना तफावत आढळल्यास याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवण्यात येणार आहे.