अरविंद केजरीवाल यांची टीका

नवी दिल्ली : मोदी-शहा यांना पुन्हा केंद्रात सत्ता मिळाली तर त्याला जबाबदार फक्त राहुल गांधी हेच असतील, अशी घणाघाती टीका ‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी केली. ‘आप’च्या जाहीरनामा प्रकाशनाच्या कार्यक्रमात केजरीवाल यांनी ‘आप’शी आघाडी न होण्यास काँग्रेसचा आडमुठेपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला.

दिल्लीच्या जोडीला हरियाणा आणि पंजाबमध्येही आघाडी करावी ही ‘आप’ची प्रमुख मागणी काँग्रेसने मान्य न केल्याने चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही दोन्ही पक्षात आघाडी झाली नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. त्याचा संदर्भ देत केजरीवाल म्हणाले की, कुठलीही राजकीय आघाडी ट्विटरवरून केली जाते हे राहुल यांनी सांगावे. काँग्रेसला आघाडी करण्यात स्वारस्यच नव्हते. गेले दोन महिने ‘आप’ने काँग्रेसशी आघाडी करण्याबाबत प्रयत्न केले. पण, आता मोदी-शहा द्वयी सत्तेवर आली तर त्याची जबाबदारी राहुल गांधी यांचीच राहील! दिल्लीत १२ मे रोजी मतदान होणार असून दोन्ही पक्षांनी सातही मतदारसंघांत स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे दिल्लीत भाजप-काँग्रेस-आप असा सामना रंगेल.

‘आप’च्या दृष्टीने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळणे हा कळीचा राजकीय मुद्दा असून त्याचा समावेश जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खाते (एसीबी) केंद्राकडे असल्याने ते लोकनियुक्त राज्य सरकारच्या अख्यत्यारीत आणण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक  डोळ्यासमोर ठेवून ‘आप’ने जाहीरनाम्यातील अग्रक्रम ठरवले असल्याचे मानले जाते.

देशाच्या राजधानीतील जनतेला महाविद्यालये आणि नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण, शिक्षण, आरोग्य, महिलांची सुरक्षा, पोलीस सुधारणा, शून्य भ्रष्टाचार, नोकऱ्या, जमीन आणि गृहनिर्माण, स्वच्छता, परिवहन, प्रदूषण आदी विषयांवर जाहीरनाम्यात प्रकाशझोत टाकला आहे.