न्यायालयाचा अवमानप्रकरण

नवी दिल्ली : ‘चौकीदार चोर है’ हे वाक्य सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घातल्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. याबाबत भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेला न्यायालयीन अवमानाचा खटला संपवण्यात यावा, अशी विनंतीही राहुल गांधी यांनी केली आहे.

‘चौकीदार चोर है, हे आता न्यायालयानेही मान्य केले आहे,’ हे विधान आपण राजकीय प्रचाराच्या वेळी चुकून केले, त्याबाबत आपण सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागत आहोत, असे राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. हे विधान सहेतुक केले नव्हते आणि त्यात न्यायालयाचा अवमान करण्याचा उद्देश नव्हता, न्यायालयाच्या प्रशासकीय प्रक्रियेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कुठलाही हस्तक्षेप करण्याचा माझा हेतू नव्हता, असेही राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करून माफी मागण्याचे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ३० एप्रिल रोजीच दिले होते. ‘चौकीदार चोर है’  असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचे राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सांगितले होते. त्यावर न्यायालयीन अवमानाची याचिका दाखल झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खेद व्यक्त केला होता. पण खेद म्हणजे माफी नव्हे, त्यामुळे राहुल गांधी यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी मीनाक्षी लेखी यांनी केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने १० एप्रिलला राफेल प्रकरणी फेरविचार याचिकेसोबतची कागदपत्रे दाखल करून घेण्याबाबत केंद्राने घेतलेले आक्षेप फेटाळले होते. त्या वेळी राहुल गांधी यांनी न्यायालयानेही ‘चौकीदार चोर है’, असे म्हटल्याचे विधान केले होते.