मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी आणि भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले, त्यादिवशी माझे सुतक संपले असे विधान प्रज्ञासिंह यांनी केल्यानंतर मनसेनेही त्यावर टिका केली आहे. मोदी शहाची टोळी हरेल तेव्हा आमचे सुतक सुटेल असे ट्विट मनसेचे प्रवक्ते अमेय खोपकर यांनी केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना खोपकर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘मुक्ताफळं म्हणावं की गटारगंगा? हा प्रश्न पडलाय. स्वत:ला साध्वी म्हणवणाऱ्या भोपाळच्या उमेदवारामुळे आमच्या करकरे साहेबांविषयी नको ते बरळून या कथित साध्वीने भाजपाची देशभक्ती नक्की कशी असते हे दाखवून दिलंय. याचा नुसता निषेध करुन भागणार नाही, जेव्हा ही मोदी- शहांची टोळी निवडणूक हरेल तेव्हाच आता आमचं सुतक संपेल.’

आज राज ठाकरे यांची रायगडमध्ये सभा होणार असून या सभेमध्ये ते साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याबद्दल काही बोलतात का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

नक्की वाचा >> दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारुन माझं सुतक संपवलं: साध्वी प्रज्ञासिंह

काय म्हणाल्या साध्वी

साध्वी प्रज्ञासिंह यांनी भोपाळमध्ये गुरुवारी एका कार्यक्रमात शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी भाष्य केले.साध्वी प्रज्ञासिंह या भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार असून त्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. “तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही”, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला.

नक्की वाचा >> साध्वींच्या विधानावर भाजपा प्रवक्ते म्हणतात…

त्या पुढे म्हणाल्या, हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. यावर मी म्हटलं की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान साध्वींनी केले. रावणाचा अंत प्रभू रामाने संन्याशांच्या मदतीने केला होता. २००८ मध्येही हेच झाले. निरपराध संन्याशांना तुरुंगात डांबण्यात आले. यावर मी सर्वनाश होईल असा श्राप दिला होता आणि त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहित आहे, असे साध्वींनी म्हटले आहे.

साध्वी यांच्या या वक्तव्यावरुन भाजपावर होणारी टिका पाहता भाजपाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.