माझ्या नागरिकत्त्वाची आत्ताच एवढी चर्चा कशासाठी होते आहे? मी कधीही माझे नागरिकत्त्व लपवलेले नाही. माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे हे मी लपवलेले नाही. तसेच मागील सात वर्षात मी एकदाही कॅनडात गेलो नाही. मी भारतात काम करतो त्यामुळे इथले सगळे करही भरतो आहे तरीही माझ्या नागरिकत्त्वाची चर्चा होते आहे. त्यावरून नकारात्मकता पसरवली जाते आहे. हे सगळे का होते आहे ते माझ्यासाठी अनाकलनीय आहे असे अक्षय कुमारने म्हटले आहे.

मी भारतात रहातो आहे, इथले कर भरतो आहे. मला या देशाविषयी जे प्रेम वाटते ते सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. मात्र सध्या माझ्या नागरिकत्त्वावरून जी चर्चा होते आहे त्यामुळे मी नाराज झालो आहे. मी कोणत्या देशाचा नागरिक आहे? यावरून चर्चा होते आहे. हा माझा व्यक्तिगत विषय आहे. तसेच हा अराजकीय मुद्दा आहे असेही अक्षय कुमारने म्हटले आहे.

सोमवारी मुंबईसह देशात लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील आणि मुंबईत रहाणाऱ्या तारे-तारकांनीही मतदानाचा हक्क बजावला. तर काही कलाकारांची मात्र मतदान करण्याची संधी हुकली. यामध्ये अक्षय कुमारचादेखील समावेश आहे. कायम देशाचे हित जपणाऱ्या अक्षयने आपल्या मतदानाचा हक्क बजावला नाही, त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं. अक्षयचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून यामध्ये तो मतदानाविषयीच्या प्रश्नांची उत्तर देण्याचं टाळतो असं दिसतं आहे. दरम्यान अक्षय कुमार भारताचा नागरिक नाही त्यामुळे तो मतदान करू शकला नाही अशी चर्चा रंगते आहे. या सगळ्या चर्चेवर अक्षय कुमारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.