लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळून झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकदा राम मंदिराचा उल्लेख केला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्या राम मंदिरासंबंधी सूचक विधान केलं आहे. रामाचं काम करायचं आहे आणि रामाचं काम होणारच असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं आहे. यावर लक्षही ठेवलं जाईल असंही ते म्हणाले आहेत. मोहन भागवत यांनी थेट राम मंदिराचा उल्लेख केला नसला तरी त्यांचं हे विधान त्याच्याशी निगडीत असल्याचं बोललं जात आहे.

उदयपूर येथे आयोजित संघ शिक्षा वर्ग प्रशिक्षणादरम्यान मोहन भागवत यांनी बोलताना रामाचं काम करायचं आहे आणि रामाचं काम होणारच असा विश्वास व्यक्त केला. ‘रामाचं काम करायचं आहे म्हणजेच आपलं काम करायचं आहे. आपलं काम आपण स्वत: केलं तर ठीक, दुसऱ्याकडे सोपवलं तर कोणाला तरी लक्ष ठेवावं लागतं’, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीच्या आधीही आरएसएसने राम मंदिरासंबंधी भाजपा सरकारप्रती नाराजी व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर राम मंदिर निर्माण सुरु करण्यात येईल, मग केंद्रात कोणाचंही सरकार असो असं वक्तव्य आरएसएसच्या एका नेत्याने केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणत्याही पर्यायाचा विचार केला जाणार नाही असं आधीच स्पष्ट केलं आहे. संसदेत अध्यादेश आणून राम मंदिर निर्माण कऱण्याचा मार्ग मोकळा करण्यात यावा अशी मागणी आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेक़डून करण्यात आली होती.