मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह या पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. सोमावारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करायला व्हीलचेअरवर गेलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी प्रचारफेरीत भजनाच्या तालावर दंग होऊन ठेका धरला.

भोपाळमध्ये एका प्रचारफेरीमधील प्राज्ञासिंह यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रज्ञासिंह काही माहिलांबरोबर नाचताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी व्हीलचेअरवरुन जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी पोहचलेल्या प्रज्ञासिंह संध्याकाळी प्रचारफेरी सहभागी झाल्या. या फेरीमध्ये त्या एका सिंधीबहुल परिसरामध्ये पोहचल्या. तेथील महिला भजनात दंग होऊन नृत्य करत होत्या. त्या महिलांनी प्रज्ञासिंह यांना आपल्यासोबत ठेका धरण्याचा आग्रह केला. प्रज्ञासिंह यांनाही भजनाच्या तालावर नाचण्याचा मोह आवरला नाही. या संदर्भातील वृत्त दैनिक भास्कर या हिंदी वेबसाईटने दिले आहे. एकीकडे उमेदावारी अर्ज दाखल करायला जाताना व्हील चेअरवर जाणाऱ्या प्रज्ञासिंह प्रचारामध्ये नाचू कशा लागल्या असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रज्ञासिंह व्हील चेअरवरुन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचलेल्या होत्या. अर्ज भरायला जाताना प्रज्ञासिंह यांनी केलेल्या रोड शोमुळे संपूर्ण भोपाळ शहराला भगवे रुप प्रात्प झाले होते. तब्बेत ठीक नसल्याने प्रज्ञासिंह बऱ्याचदा व्हील चेअरवरच असतात. क्वचितच त्या चालताना दिसतात. तसेच चालताना त्यांना शीडी चढण्यासाठी वगैरे इतरांची मदत लागते. मात्र आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्या नाचताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रज्ञासिंह यांना प्रकृतीच्या कारणामुळे जामीन मंजूर करण्यात आला आहे.


(व्हिडिओ सौजन्य: टीव्ही 9 भारतवर्ष युट्यूब चॅनेल)

निवडणूक प्रचारादरम्यान प्रज्ञासिंह मतदारांना भावनिक आवाहन करत लोकांना निवडणुक लढण्यासाठी आर्थिक मदत करण्याची मागणी करत आहेत. आपल्या प्रचारफेऱ्यांमध्ये प्रज्ञासिंह देणगी गोळा करताना दिसत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रज्ञासिंह यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ‘मी संन्यासी असून माझ्याकडे ज्ञान आहे पण धन नाहीय. त्यामुळे एक संन्यासीम म्हणून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मला दान देऊ शकता’, असं म्हटलं होतं.