मनराज गरेवाल शर्मा,खदूर साहेब

प्रचारात उमेदवार तसेच पक्षाला दुय्यम स्थान

शिरोमणी अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल व्यासपीठावर येताच, जो बोले सो निहालच्या घोषणा सुरू होतात. त्यानंतर ९१ वर्षीय बादल ,भाषणाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा जोरदार घोषणा देण्याचे आवाहन ते जनसमुदायाला करतात. या वेळी बादल यांच्या प्रचाराचे वैशिष्टय़ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ते मते मागत आहेत.

२०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत बादल यांच्या पक्षाच्या दारुण पराभवानंतर सक्रिय राजकारणातून ते थोडे बाजूला झाले आहेत. पण आता लोकसभा निवडणुकीत अकाली दलाला यश मिळावे यासाठी ते सभा घेत आहेत. तुम्हाला पुन्हा मोदींना विजयी करावे लागेल असे आवाहन ते सभांमधून करत आहेत.

काँग्रेसकडे राहुल गांधी आहेत, पण त्यांना अनुभव काय? असा त्यांचा सवाल आहे. १९८४ मधील दंगे, ऑपरेशन ब्लूस्टार तसेच नेहरू-गांधी कुटुंबाने शीख समाजावर अन्याय केल्याचा आरोप बादल प्रचारात करत आहेत. मोदींनी धरण बांधण्याची प्रतिज्ञाच केली असून, त्यामुळे पाकिस्तानमध्ये एक थेंबही पाणी जाणार नाही असे ग्रामीण भागातील जनसमुदायाला ते सांगतात.

अनेक निवडणुकांचा अनुभव असलेले प्रकाशसिंग हे वयाच्या २१ व्या वर्षी ते बादलचे सरपंच झाले, त्यानंतर चार वर्षांनी आमदार झाले. आतापर्यंत दहा वेळा ते विधानसभेवर गेले आहेत.

बादल यांच्याबाबत जनतेमध्येही आदर आहे. या वयात त्यांची प्रकृती बरी नसेल असे वाटत होते. मात्र त्यांना पाहिले की ते तंदुरुस्त वाटतात अशी प्रतिक्रिया पत्ती येथील बेगमपुरा खेडय़ातील बलविंदर सिंग यांनी दिली. लोहार खेडय़ातील लाखासिंह यानेही बादल म्हणतात तेच योग्य आहेत. मोदी हे आमच्यासाठी चांगले आहेत अशी प्रतिक्रिया दिली. लाखा याची चौथी पिढी आता अकाली दलामध्ये आहे.मोदींनी गुजरातमध्ये विकास केला, जगात भारताची प्रतिष्ठा वाढविली याचेच  झिरा येथील दुसऱ्या सभेतही  बादल यांनी दिले.

प्रचारात बादल हे मोदींवर अवलंबून आहेत याचा अर्थ अकाली दल कमकुवत झाला आहे असे मत पंजाब विद्यापीठातील राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. आशुतोष कुमार यांनी व्यक्त केले.

खदूर साहेब मतदारसंघात अकाली दलाने बिबी जागीर कौर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या जसबिर सिंग डिंपा यांच्याशी आहे.