16 October 2019

News Flash

मुंबईतील नवमतदारांसाठी सेल्फी स्पर्धा

निवडक दहा मतदारांची विधानसभेच्या निवडणुकीत ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून निवड करणार

(संग्रहित छायाचित्र)

निवडक दहा मतदारांची विधानसभेच्या निवडणुकीत ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून निवड करणार; शहर जिल्हाधिकारी कार्यालयाची योजना

सुशांत मोरे, मुंबई

तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने मुंबई शहरातील नवमतदारांसाठी ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २९ एप्रिल या मतदानादिवशी १८ ते १९ वर्षांच्या नवमतदारांनी मतदान केल्याचा फोटो निवडणूक कार्यालयाने उपलब्ध केलेल्या वॉट्स अ‍ॅप नंबरवर पाठवायचा आहे. यापैकी निवडक दहा मतदारांची विधानसभा निवडणुकीसाठी ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून निवड केली जाणार असून विधानसभा निवडणुकीतील मतदानजागृती कार्यक्रमांत त्यांचा समावेश केला जाणार आहे.

मुंबई शहरात दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई असे लोकसभा मतदार संघ असून धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा असे दहा विधानसभा मतदार संघ येतात. या मतदार संघात २४ लाख ५६ हजार ४९७ मतदार असून १८ ते १९ वयोगटातील १७ हजार ४०४ नवमतदारांची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक मतदार हे ४० ते ४९ वयोगटातील असून त्यांची संख्या ५ लाख ८३ हजार ९२५ आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नवमतदारांनी मतदान करावे, यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणुक कार्यालयाने ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा मतदान केल्यानंतर नवमतदार आपला सेल्फी पाठवू शकणार आहेत. त्यासाठी निवडणूक कार्यालयाकडून वॉट्स अ‍ॅप नंबरही उपलब्ध केला जाणार आहे. यात सवरेकृष्ट सेल्फीला पारितोषिक देण्यात येईल. तसेच प्रोत्साहन प्रमाणपत्रही नवमतदारांना दिले जाईल.

या उपक्रमानुसार १८ ते १९ वयोगटातील नवमतदार मतदान केंद्राच्या बाहेर १०० मीटर अंतरावर येऊन मतदान केल्याचा सेल्फी काढेल व तो फोटो पाठवेल. तसेच नाव, मतदान केंद्र, मतदान यादीतील नंबरदेखील पाठवू शकणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत ही माहिती पाठवल्यास ती ग्राह्य़ धरली जाईल.

अशा दहा विधासभा मतदारसंघातून दहा नवमतदारांची निवड केली जाणार आहे. त्यांची येत्या विधानसभा निवडणुकीसाठी बॅ्रन्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात येईल. यात त्यांच्या भागातील महाविद्यालयातील तरुणांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक आणि ई मेलची माहिती २९ एप्रिल रोजी होणाऱ्या पाच ते सहा दिवस मतदानाआधी दिली जाणार आहे.

First Published on April 16, 2019 2:27 am

Web Title: selfie contest for first time voters in mumbai