News Flash

भाजपकडून दगाफटका होण्याची शिवसेनेला धास्ती?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

नीलेश राणे व विनायक राऊत

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

सतीश कामत, रत्नागिरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या दुर्लक्षाबद्दल धडा शिकवण्याच्या भावनेने पछाडलेल्या भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेनेला काही प्रमाणात दगाफटका होण्याची स्पष्ट चिन्हे असल्यामुळे एरवी सुकर वाटणाऱ्या विजयामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.

शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी नाराजी दूर करण्याकरिता दोन्ही बाजूंच्या प्रमुख नेतेमंडळींची खास बैठक घेतली. नाराज भाजप नेत्यांची या वेळी अर्थपूर्ण समजूत काढण्यात आली. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही भेट घडवून आणण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी आपल्या पक्षाच्या नाराज पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे उमेदवारी अर्जापूर्वीचा जाहीर मेळावा आणि प्रत्यक्ष अर्ज भरण्याचा सोहळा सुरळीतपणे पार पडला. पण त्यानंतर मुख्यमंत्री कोल्हापूरला प्रचारासाठी आले असता काही निवडक पदाधिकाऱ्यांची झालेली धावती भेट वगळता त्या आघाडीवर फार काही घडले नाही. त्यानंतरही गेल्या सुमारे तीन आठवडय़ांत मोजक्याच एकत्र बैठका किंवा प्रचारसभा वगळता युती म्हणून फारसे प्रभावी नियोजन किंवा प्रचार होताना दिसलेला नाही. दोन्ही बाजूंकडील राज्य पातळीवरील नेत्यांपैकी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या गुरुवारी सिंधुदुर्गात कणकवली येथे प्रचारसभा घेतली. राऊत यांचे या निवडणुकीतील मुख्य प्रतिस्पर्धी नीलेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या या सभेला गर्दीही चांगली जमवली होती. पण त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते अभावानेच दिसत होते. उलट, सभेपूर्वी भाजपचे एक स्थानिक पदाधिकारी भेटले तेव्हा त्यांनी, आमच्यापैकी कोणालाही या सभेचे निमंत्रण नसल्याचे सांगून हजर राहणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

जिल्ह्य़ात भाजपचे सुमारे ७५ हजार मतदार असून येत्या चार दिवसांत पक्षश्रेष्ठींकडून स्पष्ट आदेश न आल्यास लक्षणीय मतदान अन्यत्र फिरू शकते, असेही त्याने छातीठोकपणे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस स्वतंत्र सभा घेऊन राणेंबद्दलची भूमिका जाहीर करतील, असे राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते, पण ते आलेच नाहीत. त्यांच्या वतीने भाजपचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या सभेला हजेरी लावून तोंडभर शुभेच्छा दिल्या. पण राणे यांच्याबद्दल चकार शब्दही काढला नाही. त्यामुळेही कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच संदेश गेला आहे.

दुसरीकडे राणे कुटुंबाच्या दृष्टीने ही राजकीय अस्तित्वाची लढाई असल्यामुळे स्वत: नारायण राणे आणि उमेदवार नीलेश, आमदार नितेश या त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी स्वत:ला प्रचारात अक्षरश: झोकून दिले आहे. युतीमधील अनेक असंतुष्ट आपल्या संपर्कात असल्याचे ते आवर्जून सांगत आहेत आणि त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. शिवाय, या निवडणुकीतील तिसरे प्रमुख उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना सर्वसामान्य मतदार सोडा, त्यांचे कार्यकर्तेही शोधत असतात, अशी परिस्थिती आहे. येथील राजकारणात मुरलेले नारायण राणे याचा फायदा न उचलतील तरच नवल. त्यांनी त्या दृष्टीने गळ टाकायला सुरुवातही केली आहे. तरीसुद्धा नवीन पक्ष आणि रेफ्रिजरेटर हे निवडणूक चिन्ह, हे दोन त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठे अडचणीचे मुद्दे आहेत. विशेषत:, ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी राणे म्हणजे हाताचा पंजा, हेच गेल्या सुमारे १२ वर्षांतील अनेक निवडणुकांच्या माध्यमातून त्यांच्या मतदाराच्या डोक्यात घट्ट बसलेले समीकरण आहे. शिवाय, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात देवगड-कणकवली आणि कुडाळ-मालवण या टापूत त्यांचे भक्कम जाळे असले तरी काही महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्यमंत्री केसरकर आणि आमदार वैभव नाईक राणेंचा वारू अडवण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न करणार, हे उघड आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ाचा काही भाग त्यांनी पोखरला असला तरी राणे म्हणून त्यांची ताकद कधीच नव्हती. उलट तीन आमदार, जिल्हा परिषद, नगर परिषद इत्यादींच्या माध्यमातून सेनेचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. तरीसुद्धा जिल्ह्य़ातील सेनेच्या संघटनेतही सारे आलबेल नाही, ही राणेंसाठी आशेची जागा आहे.

विनायक राऊत यांच्यापुढे दुहेरी आव्हान

मागील निवडणुकीत राऊत यांनी नीलेश राणे यांचा सुमारे दीड लाख मतांनी पराभव केला होता. त्यामध्ये मोदी लाटेचाही मोठा वाटा होता. या वेळी ती लाट नाही आणि युतीमध्ये फटी पडलेल्या, असे दुहेरी आव्हान राऊत यांच्यापुढे आहे. ते आणि शिवसेनेचे त्यांचे सहकारी नेते त्याचा कसा सामना करतात, यावर या मतदारसंघातील निकालाची गणिते अवलंबून आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 4:20 am

Web Title: shiv sena bjp alliance 2019 ratnagiri sindhudurg lok sabha constituency
Next Stories
1 मुले, पुतणे आणि सुनांसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
2 आघाडीला धक्के देण्याचा युतीचा प्रयत्न
3 नव्या पिढीतील मतदार राजासाठी ‘फ्लिपकार्ट’चा जागर
Just Now!
X