युतीत मनोमिलन नाहीच; भाजपच्या गोटात अस्वस्थता

मुंबई : शिवसेनेच्या मागणीवरून ईशान्य मुंबईतील आपला उमेदवार बदलूनही भारतीय जनता पक्षाला (भाजप) मित्रपक्ष शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून म्हणावे तसे सहकार्य मिळत नसल्याचे वातावरण आहे. महायुतीच्या प्रचारापासून शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी लांब आहेत. शिवसेनेचे अनेक नेते, कार्यकर्ते विरोधकांच्या व्यासपीठावर दिसू लागल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.

सेनेचे भांडुपचे आमदार अशोक पाटील सध्याचे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या विरोधात गेल्या विधानसभा निवडणुकीत लढले होते. मुलुंडचे स्थानिक असूनही कोटक यांनी कडवी झुंज दिली. त्यामुळे पाटील यांचा जेमतेम तीन हजार मतांनी निसटता विजय झाला. त्यानंतर झालेल्या महापालिका लढतीत पाटील यांच्या पत्नी मिनाक्षी पडल्या. तेथे काँग्रेसच्या प्रमिला पाटील निवडून आल्या. प्रमिला यांच्या अचानक निधनाने तेथे पोटनिवडणूक लागली. त्यातही प्रमिला यांच्या स्नुषा जागृती (भाजप) विजयी झाल्या. मिनाक्षी यांचा पुन्हा पराभव झाला. पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार विजयी व्हावा यासाठी महापालिकेतील गटनेते कोटक भांडुपमध्ये ठाण मांडून होते. ही जुनी सल कायम असल्याने अशोक पाटील कोटक यांच्या प्रचारात नाममात्र सहभागी होत असावे, अशी चर्चा आहे. त्यांनी प्रचारात उतरावे यासाठी गेल्या आठवडय़ात कोटक यांनी पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली.

पाटील यांच्या पाठोपाठ सेनेचे नेते, माजी आमदार शिशीर शिंदे हे देखील महायुतीच्या प्रचारातून पूर्णपणे अलिप्त आहेत. त्यांची आणि कुटुंबातील सदस्याची प्रकृती ठिक नसल्याने ते प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सहभागी होतील असे समजते.

दुसरीकडे विक्रोळीतील सेना आमदार सुनील राऊत यांनी कंजूरमार्ग येथील एका बिगर राजकीय समारंभात महाआघाडीचे उमेदवार संजय पाटील यांना विजयाच्या ‘मनापासून’ शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या विधानाची ध्वनीचित्रफित सर्वदूर पसरल्याने सेना कार्यकर्ते संभ्रमित झाले. त्यानंतर राऊत यांना त्या विधानावर स्पष्टीकरण द्यावे लागले. या शिवाय घाटकोपर पूर्व, पश्चिम आणि मानखुर्द या तीन विधानसभा मतदारसंघातील सेना नगरसेवक नाराज आहेत. यापैकी काहींनी प्रचार करणार नाही, अशी भूमिका वरिष्ठांकडे कळविली आहे.

घाटकोपर पूर्व मतदारसंघातील कामराज नगर येथील सेना नगरसेवक परमेश्व्र कदम यांनी परिसरातील रखडलेले झोपू प्रकल्प मार्गी लागत नाहीत तोवर प्रचारात उतरणार नाही, निवडणुकीवर बहिष्कार घालू अशी भूमिका घेतली होती. येथील ओमसाई आणि आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सुमारे २० हजार प्रकल्पग्रस्तांनी त्यांना पाठिंबा दिला होता. अखेर रविवारी सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री—स्थानिक आमदार प्रकाश मेहता, संबंधित विकासक आणि प्रकल्प ग्रासतांचे शिष्ठ मंडळ अशी बैठक झाली. त्यात ठोस आश्वासन मिळाल्याने बहिष्काराची भूमिका मावळल्या समजते. परंतु, सेना-भाजपमधील धुसफूस कायम आहे.

घाटकोपर येथील भाजप लोकप्रतिनिधींकडून श्रेय लाटण्याचे सततचे प्रकार, तक्रारी, राजकीय किंवा वैयक्तिक संघर्ष यातून बरेच सेना पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज व दुखावलेले आहेत. अनेक पदाधिकारी आधीच्या टप्प्यांमधील निवडणूक प्रचारनिमित्त कोकण आणि अन्य भागात आहेत. २० एप्रिलनंतर ही मंडळी प्रचारात उतरतील अशी अपेक्षा भाजपला आहे.

भाजप सावध

सेनेचा एकही प्रमुख नेता किंवा पदाधिकारी पूर्णपणे अलिप्त नाही. काहींवर वैयक्तिक, पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या आहेत. आमदार पाटील, नेते शिंदे निश्चितपणे प्रचारात उतरतील. सेनेचे विभागप्रमुख रमेश कोरगावकर महायुतीच्या प्रचारार्थ मुलुंड, भांडुप, विक्रोळी पिंजून काढत आहेत. कुठेही नाराजीचे वातावरण नाही. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते समन्वय साधून आहेत, अशी प्रतिक्रिया ईशान्य मुंबईतील भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकारम्य़ाने ‘लोकसत्ता‘कडे व्यक्त केली.