राफेलबाबत निर्णयानंतरच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरणाचे निर्देश

राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सोमवारी नोटीस बजावली. सर्वोच्च न्यायालयाने न उच्चारलेली वाक्ये राहुल यांनी न्यायालयाच्या तोंडी घातल्याबाबत सोमवापर्यंत स्पष्टीकरण द्यावे, असे न्यायालयाने नोटिशीत म्हटले आहे.

राफेल विमाने खरेदीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेसोबत संरक्षण मंत्रालयातून फुटलेली गोपनीय कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे फेरविचार याचिका फेटाळण्याची केंद्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून ही कागदपत्रे ग्राह्य़ धरली आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांनी या प्रकरणी ‘चौकीदार चोर है’, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आपल्या निर्णयात ‘चौकीदार चोर है’ असे कुठेही म्हटलेले नसल्याचे नमूद करत न्यायालयाने अवमान याचिकेवर राहुल यांना नोटीस बजावली. या नोटिशीला राहुल यांना २२ एप्रिलपर्यंत उत्तर द्यायचे आहे.

भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी अवमान याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर पुढील आठवडय़ात मंगळवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या नोटिशीनंतर मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. घटनात्मक नैतिकता आणि लोकशाही परंपरेची जाण नसलेले राहुल संसदेत जनतेचे कसे प्रतिनिधित्व करणार, असा सवाल त्यांनी केला.

राहुल यांच्याकडून राजकीय हेतूने चिखलफेक : जेटली

लोकशाहीमध्ये कुठल्याही घराण्याला न्यायालयाचा आदेश बदलण्याची मुभा नसते. पण, राहुल गांधी यांनी न्यायालयाच्या आदेशाची मोडतोड केली. राजकीय हेतूने त्यांनी चिखलफेक केली. राजकीय अजेंडा राबवण्यासाठी राहुल गांधी खालच्या स्तरावर घसरले आहेत. जितका त्यांचा स्तर घसरेल तितके आम्ही  उच्चांक गाठू, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी केली आहे.