23 October 2019

News Flash

VIDEO : सुप्रियांनी घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा दावा; षडयंत्र असल्याचा सुप्रियांचा आरोप

सुप्रिया सुळे यांनी राहुल शेवाळे यांना फोन करून जाब विचारल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

लोकसभा निवडणूकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक राहिले असताना, देशभरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्याचे पाहावयास मिळत आहेत. आता एका नव्या वादाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचं कारण म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी मधून भाजपात गेलेले राहुल शेवाळे यांच्यातील कथित संभाषण. या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यात सुप्रिया सुळे म्हणतात की, या माझ्या नादाला लागू नका. मी काही कंत्राटदार नाही. घरात घुसून ठोकून काढेल. अशी भाषा राहुल शेवाळे यांना वापरल्याने सोशल मीडियावर हा ऑडिओ झाल्याने त्यावर एकच चर्चा सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील शेवाळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सुळेंविरोधात काही विधाने केल्याच्या बातम्या देखील प्रसारीत झाल्या. त्या बातम्यांची दखल घेत, खासदार सुप्रिया सुळे यांनी राहुल शेवाळे यांना फोन करून जाब विचारल्याचा दावा करणारी ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे यांच्यात झालेले कथित संभाषण

सुप्रिया सुळे : हॅलो मी सुप्रिया सुळे बोलते. राहुल शेवाळे मी तुम्हाला केव्हा अपमानित केले आहे?
राहुल शेवाळे : अस काही नाही ताई, पेपर मध्ये चुकीची स्टेटमेंट आले आहेत.
सुप्रिया सुळे : तुम्ही भाजपात गेला आहात ठीक आहे. पण माझ्या नादी लागू नका. मी खूप सिरियस आहे. मी काही काँट्रॅक्टर नाही. घरात घुसून ठोकून काढेल. माझ्या बदनामी विरोधात अब्रूनुकसानीचा दावा करेल एक लक्षात ठेवा. मी काही काँट्रॅक्टर नाही. कुणाच्या बापाचे पाच पैसे खाल्ले नाही एवढं लक्षात ठेवा.

या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तर या खळबळजनक ऑडिओ बाबत सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. शेवाळे यांनी सुप्रिया सुळेंनी धमकी दिल्याचा दावा केला असून ही बाब आपण मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घातल्याचे सांगितले.

तर हे माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचा दावा सुप्रियांनी केला आहे. आपण बदनामीचा दावा करणार असल्याचे सुप्रियांनी म्हटले असून महिला प्रगती करत असल्याचे बघवत नसल्यानं षडयंत्र रचण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.

First Published on April 18, 2019 1:45 pm

Web Title: supriya sule threatens rahul shevale she says it is conspiracy