‘शेवटच्या निवडणुकीत’ही पराभवाचा धक्का

एजाजहुसेन मुजावर, सोलापूर

काँग्रेसचे मातबर नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी  २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत पराभव पत्करल्यानंतर त्याचा वचपा काढण्यासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठी कंबर कसली होती. मागील वेळेप्रमाणे यंदाही ही निवडणूक शेवटची असल्याचे जाहीर करीत त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली होती. परंतु मतदारांनी त्यांना पुनश्च नाकारल्याचे दिसून आले. लागोपाठ दुसऱ्यांदा झालेल्या धक्कादायक पराभवाच्या पाश्र्वभूमीवर शिंदे यांची राजकीय सद्दी संपल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुशीलकुमार शिंदे हे गेली ४५ वर्षे राज्याच्या आणि देशाच्या सत्ताकारणात होते. सोलापूरच्या न्यायालयातील एक साधा पट्टेवाला पुढे पोलीस फौजदार बनतो आणि नंतर राजकारणात पदार्पण करीत मजल दरमजल गाठत मंत्रिपदापासून ते मुख्यमंत्री, राज्यपाल, देशाचा ऊर्जामंत्री, गृहमंत्री आणि लोकसभेच्या सभागृहनेतेपदापर्यंत देदीप्यमान वाटचाल करतो. सोलापुरातील ढोर गल्लीत एका गरीब ढोर कुटुंबीयांत जन्मलेल्या सुशीलकुमारांची ही राजकीय यशोगाथा खरोखर थक्क करणारी आहे. सुशीलकुमार आणि सोलापूर असे समीकरणही ठरलेले होते. यापूर्वी सोलापूर लोकसभा मतदार संघ सर्वसाधारण असताना देखील शिंदे यांना सोलापूरकरांनी भरभरून प्रेम करीत तीन वेळा निवडून दिले होते. त्यानंतर हा मतदार संघ राखीव झाल्यानंतरही २००९ साली शिंदे हे पुन्हा याच सोलापुरातून लोकसभेवर निवडून गेले होते. राज्यात असताना तब्बल सात वेळा अर्थसंकल्प मांडणारा अर्थमंत्री म्हणून त्यांची ओळख सोलापूरकरांसाठी अभिमानाची बाब होती. युनोमध्ये त्यांनी केलेले भाषण हे देखील सोलापूरकरांसाठी कौतुकाचा विषय ठरला होता. परंतु सोलापूरकरांनी शिंदे यांच्यावर जेवढे भरभरून प्रेम केले, तेवढाच त्यांच्यावर रागही काढला आहे. यापूर्वी २००३ साली शिंदे हे नवी दिल्लीतून राज्यात परतून मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या खासदारकीच्या रिकाम्या झालेल्या सोलापूर लोकसभेची पोटनिवडणूक झाली, तेव्हा त्यांच्या पसंतीचे उमेदवार राहिलेले दिवंगत माजी मंत्री आनंदराव देवकते यांना पराभव पत्करावा लागला होता. एवढेच नव्हे तर पुढे २००४ सालच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. खऱ्या अर्थाने येथपासूनच त्यांच्या पीछेहाटीला प्रारंभ झाला होता.

या पाश्र्वभूमीवर शिंदे यांनी रुसलेल्या सोलापूरकरांची मने रिझविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काही उद्योग प्रकल्प आणले. परंतु सोलापूरच्या विकासासाठी शिंदे यांनी काय केले, या प्रश्नाचे उत्तर देत एकांडय़ा शिलेदाराप्रमाणे स्वत:चा बचाव करण्याची वेळ शिंदे यांच्यावर यावी ही देखील त्यांच्यासाठी दुर्दैवी बाब ठरली.

भावनिक साद नाकारली

२०१४ सालची लोकसभा निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनी घोषितही केले होते. ती शेवटची निवडणूक ‘गोड’ व्हावी, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु त्या वेळच्या मोदी लाटेत त्यांना सुमारे दीड लाखांच्या मताधिक्याने धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. यंदाच्या निवडणुकीत शिंदे हे पुन्हा उतरले होते. ही निवडणूक देखील आपली शेवटची असून मला निवडून द्यावे, अशी भावनिक साद घातली खरी; परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मागील पराभवाचीच पुनरावत्ती यंदाही झाली. त्यामुळे सोलापुरातील शिंदे यांची राजकीय सद्दी आता संपल्यात जमा असल्याचे मानले जात आहे. शिंदे यांचा हा पराभव सोलापूरच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरला आहे.