— समीर जावळे, जळगाव

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २०१४ प्रमाणे मोदींची लाट नाही मात्र पंतप्रधानपदी मोदीच विराजमान होतील असं मत जळगावातल्या व्यापाऱ्यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना व्यक्त केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जीएसटी आणि नोटाबंदीचा काय परिणाम झाला हे देखील आम्ही जाणून घेतलं.

नोटाबंदीचा निर्णय बहुतांश व्यापा-यांना रूचलेला नाही. नोटाबंदीच्या निर्णयामुळे नुकसान सहन करावं लागलं, अजूनही तोटा सहन करतो आहोत असं फुलांच्या बाजारातील व्यापा-यांनी सांगितलं. जीएसटीबाबत सुरूवातीला फारशी माहिती नव्हती आता मात्र हा कर भरण्यास फारशा अडचणी येत नाहीत. हा कर सोयीस्कर वाटतो आहे असं मत काही जणांनी व्यक्त केलं. मोदी सरकारच्या काळात अनेक चांगले निर्णय झाले. व्यवहार डिजिटल करण्याचा निर्णयही चांगला आहे, त्यामुळे काळ्या व्यवहारांवर आळा बसण्यास मदत झाली असंही काही व्यापा-यांनी सांगितलं.

जळगावात गेल्या अनेक वर्षांपासून कन्हैय्या स्वीट्स हे मिठाईचे दुकान चालवणारे अशोक ओझा म्हणतात, जीएसटी हा आम्हाला आधी जिझीया कर वाटला होता. सुरूवातीला काही प्रमाणात त्रास झाला मात्र वस्तुस्थिती तशी नाही. आम्हाला जीएसटीमुळे फायदाच होतो आहे. एवढंच नाही तर नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला हा निर्णय कठीण होता पण घेणं आवश्यक होतं. त्यामुळे अनेक काळ्या व्यवहारांना आळा बसला हा आमचा अनुभव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशाचं नाव सगळ्या जगात झालं. पाकिस्तानवर वचक बसवण्यात आपला देश यशस्वी झाला. आता पुन्हा एकदा त्यांना संधी दिली पाहिजे. त्यामुळे आपला देश नक्कीच विकास करेल असा विश्वास वाटतो असंही ओझा म्हणाले. सध्या मोदी लाट आहे का? असं विचारलं असता, मोदी लाट काही प्रमाणात आहे आणि त्याचा फायदा जळगावात उन्मेष पाटील यांना नक्की होईल असंही ते म्हणाले.

जळगावातील सुभाषचंद्र बोस चौकात पानाचा ठेला चालवणारे किरण देवराम बोरी म्हणतात की माझं मत मोदींनाच देणार कारण, त्यांच्यामुळे आपल्या देशाचा डंका सगळ्या जगात वाजू लागला आहे. स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला गॅस योजना, गरीबांच्या खात्यात पैसे हे सगळं मोदींनी करून दाखवलं आहे. त्यांना आणखी एक संधी देणं खूप आवश्यक आहे. कारण त्यांना आणखी एक संधी दिली तर ते देशासाठी आणखी हिताचे निर्णय घेतील. २०१४ मध्ये मोदी लाट होती. आत्ता लाट नाही मात्र पंतप्रधानपदी मोदीच विराजमान होतील असा एक विश्वास आम्हाला वाटतो असंही बोरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मोदींना देशाने आणखी एक संधी जरूर द्यायला हवी. मात्र, पुन्हा सत्तेत आल्यावर मोदींनी छोट्या उद्योजकांचा विचार करायला हवा असं मत युवासेना अध्यक्ष सागर मुंधडा यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना व्यक्त केलं. एकंदरीतच व्यापारी उद्योजकांचा कौल भाजपाला मिळेल असं दिसतंय. त्याचबरोबर मोदी सरकारने आमच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात ही मागणीही होताना दिसते आहे.