पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करुन आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. खोटा दावा करुन त्यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असून त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करून खळबळ उडवली. ममतादीदी, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तुमचे आमदारही तुम्हाला सोडून जातील. सध्या तुमचे ४० आमदार माझ्या संपर्कात आहेत, पण भाजपा निवडणूक जिंकण्याचा अवकाश तुमचे सर्व आमदार तुम्हाला सोडून येतील. तुमच्या पायाखालचे राजकीय मैदान सरकू लागले आहे, असा टोला मोदींनी लगावला होता.

मोदींच्या या विधानावरुन तृणमूल काँग्रेस आक्रमक झाली आहे. सोमवारी संध्याकाळी तृणमूलने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, मोदींनी तृणमूलचे ४० आमदार संपर्कात असल्याचा दावा करुन घोडेबाजाराला प्रोत्साहन दिले. खोटे दावे करुन मोदींनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असून निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घ्यावी. मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असून त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणीही तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात केली आहे.

दरम्यान, सोमवारी मोदींच्या दाव्यानंतर तृणमूलचे नेते डेरेक ओ’ब्रायन यांनी देखील भाजपावर टीका केली होती. पंतप्रधान मोदी, तुमचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. अशा परिस्थितीत तुमच्यासोबत कोणीही जाणार नाही. तुम्ही प्रचार करत आहात की घोडेबाजार, असे डेरेक ओ’ब्रायन यांनी म्हटले होते.