सौरभ कुलश्रेष्

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे लहान भाऊ  आहेत, असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शिवसेना कार्यकर्त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यात मोठा भाऊ भाजपच असेल, असा सूचक संदेशही त्यांनी दिला.

चार महिन्यांपूर्वी ‘पहारेकरी चोर आहे’ अशा शब्दांत लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा हात हातात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन झाले. भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव हे तर माझे धाकटे भाऊ  आहेत, असे मोदी म्हणाले.

गेली पाच वर्षे भाजप आणि शिवसेनेत कमालीची कटुता आली होती; पण भाषणात मोदी यांनी शिवसेनेचे अनेकदा कौतुक केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनात आणले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते. उद्धव यांनाही ते मुख्यमंत्री करू शकत होते, पण त्यांनी राजकारणात ही घराणेशाही आणली नाही. काँग्रेसने त्यांच्याकडून शिकले पाहिजे, असा टोला मोदी यांनी लगावला. मात्र, त्याच वेळी पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षेवर मोदी यांनी बोळा फिरवल्याची चर्चा रंगली होती. बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काँग्रेसने हिरावून घेतला होता, याची आठवण करून देत शिवसैनिकांची सहानुभूती मिळविण्याचाही प्रयत्नही त्यांनी केला. दहशतवाद्यांच्या मानवाधिकारांबाबत संवेदनशीलतेची भाषा करणाऱ्या आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यावर पडलेल्या छाप्यांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

भाजपने आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी केंद्रस्थानी ठेवल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी मोदी यांचे आभार मानले. राम मंदिर, काश्मीरला वेगळा दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करणे व शेतकऱ्यांना न्याय या मुद्दय़ांवरच युती झाल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. तसेच मोदी यांच्या हाती देश सुरक्षित असून त्यांना पर्याय नसल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

विदर्भातील सभांमधील गर्दीचा अनुशेष शिवसेनेचा सहभाग असलेल्या लातूरमधील संयुक्त सभेत भरून निघाला होता. लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि उस्मानाबादचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी या सभेसाठी ताकद पणाला लावल्याने मैदान भरून गेले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गर्दीचा आवर्जून उल्लेख केला. शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा आढावा घेत फडणवीस यांनी देशाच्या सुरक्षेसाठी मोदी यांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

 

पवार, तुम्ही तिकडे शोभत नाही!

वर्धा येथील सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी औसा येथील सभेत मात्र पवार यांच्याबाबत सन्मान व्यक्त करणारी भाषा वापरत गुगली टाकली. काँग्रेस आता देशद्रोहाचे कलम हटवण्याची, लष्कराला दहशतवाद्यांशी लढण्यासाठी दिलेल्या विशेषाधिकारांना सौम्य करण्याची भाषा बोलत आहे. शरदराव, तुम्ही त्या लोकांसोबत कसे काय? तुमच्यासारख्याला ते शोभून दिसत नाही, असा टोला मोदी यांनी लगावला.

देशाचे वर्तमान नेतृत्व दिशाभूल करणारे – शरद पवार

गोंदिया: देशाचे वर्तमान नेतृत्व हे जनहिताचे नसून दिशाभूल करणारे व भूलथापा मारणारे आहे. सरकारने शेतकरी विरोधी धोरण अवलंबले असून नोटबंदीसारखे चुकीचे निर्णय घेऊन तरुणांना बेरोजगार केले, असे प्रतिपादन साकोली येथील प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पंतप्रधान पुलवामा व सर्जिकल स्ट्राईकवर ५६ इंचाची छाती दाखवण्याचा आव आणत असले तरी अभिनंदन कुटुंबीयांनी या शौर्यावर राजकारण करण्यात येऊ नये, अशी विनंती केली. एकीकडे जागतिक दबावामुळे अभिनंदनला सोडण्यात आले तर तिकडे कुलभूषण जाधव मात्र तीन वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. त्याला सोडवण्यासाठी मोदींनी कोणते प्रयत्न केले, याचा जाब विचारण्याची वेळ आलेली आहे.  असेही आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.