पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली असतानाच यामुळे अभिनेता विवेक ओबेरॉयला नागपूर विमानतळावरुनच माघारी परतावे लागले.

‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय याने नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी विवेक ओबेरॉय हा नागपूरमध्ये येणार होता.  दुपारी तीन वाजता नागपूरमध्ये पत्रकार परिषदही होणार होती. ठरल्यानुसार विवेक ओबेरॉय नागपूरमध्येही आला. मात्र, त्यापूर्वी निवडणूक आयोगाने चित्रपटाला स्थगिती दिली. नागपूर विमानतळावर पोहोचताच विवेक ओबेरॉयला हा प्रकार समजला आणि त्यामुळे तो विमानतळाबाहेरही पडला नाही. तो विमानतळावरुनच मुंबईला रवाना झाला.

दरम्यान, ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. ११ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांतील पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात होत असून हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाल्यास त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल का, याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास सर्व पक्षांना समान संधी मिळणार नाही. तर मोदींच्या बायोपिकमुळे निवडणुकीत भाजपाला झुकतं माप मिळू शकतं, असं निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली.