उत्तर प्रदेशमधील रामपूर येथील भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याविषयी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खान यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आम्हाला बजरंग बली हवेत, अली देखील हवेत, पण अनारकली नको, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला खान यांनी रविवारी उत्तर प्रदेशमधील पान दरीबा येथे जनसभा घेतली. या सभेत अब्दुल्ला यांनी जया प्रदा यांच्यावर निशाणा साधताना वादग्रस्त विधान केले. आम्हाला अली आणि बजरंबली या दोघांची आवश्यकता आहे. पण आम्हाला अनारकली नको, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. यापूर्वी अब्दुल्ला यांचे वडील आझम खान यांनी देखील जया प्रदा यांच्या बॉलिवूड कनेक्शनवरुन टीका करत वाद निर्माण केला होता. नाचणारी आणि गाणारी खासदार नको, असे आझम खान यांनी म्हटले होते.

रविवारी झालेल्या सभेत आझम खान यांनी सांगितले की, सध्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यांच्यावरही आरोप होत आहेत. मग मी तर काहीच नाही. मी जनतेला लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्याचे आवाहन करतो. रामपूरमधील प्रशासन भाजपा उमेदवाराची मदत करत आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. माझ्या समर्थकांच्या घरावर छापा टाकला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.