अजित पवार हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. अजित पवार यांनी बारामतीत एक भाष्य केलं आहे. जे चांगलंच चर्चेत आलं आहे. जुलै २०२३ मध्ये अजित पवारांनी बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बारामतीची निवडणूक चर्चेत आली आहे. कारण या निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगणार आहे. अशात अजित पवारांनी बारामतीत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

काय म्हणाले अजित पवार?

“मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, निंबोडे गावात घोंगडी बैठक होती. कॅमेरा नव्हता, आपल्या भाषेत बोलायला गेलो तिथे धरणात.. ते काय बोलून गेलो आणि त्या वाक्यामुळे मला प्रायश्चित करायची वेळ आली. त्यानंतर कानाला खडाच लावला. कॅमेरा असो किंवा नसो नीटच बोलायचं हे मी माझ्या मेंदूला कायमच सांगत असतो. तुम्हीही जेव्हा प्रचार कराल तेव्हा नीट बोला, कुठलाही शब्द चुकीचा जाऊ देऊ नका” असं अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितलं

हे पण वाचा- “मोदी ज्या पद्धतीने देश चालवतात ते पाहून…”; शरद पवार यांचा हल्लाबोल

एकाचं कुंकू लावा-अजित पवार

अजित पवार पुढे म्हणाले, ” काही जण दादा आले की दादाच्या मागे हलगी वाजवत असतात. फटाके वाजवतात. दादाला दिसेल असंच पुढे चालत असतात आणि एकदा का दादाची पाठ फिरली दुसरे आले की त्यांच्याबरोबर असतात. अरे हे काय चाललं आहे तुमचं? एकाचं कुंकू लावा माझं तरी कुंकू लावा किंवा त्यांचं तरी कुंकू लावा. हे काय चाललं आहे चहाटळपणा? नेमकं काय करायचं आहे ते ठरवा.” असा इशाराच अजित पवारांनी दोन्ही पवारांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

तेव्हा माझे पाय लटलट कापायचे

आईच्या पोटामधून कोण शिकून येत नाही, मी पण नाही आलो, १९८४ मध्ये मी भाषण करायचो माझे पाय लटलट कापायचे. त्या लिंबाकडे बघून भाषण करायचं आणि ते लिंबाकडे माणसं बघायची, तिथे माकड बसले का, काय बसले. जिरायती पट्ट्यात फिरत असताना, रस्ते माहीत नव्हते, ही अवस्था होती माझी, म्हणून माझे सांगणे बाबांनो आज भावनिक होऊ नका, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे. दुष्काळ जाहीर केला, बारामतीत आणि वाड्यांना आता पाणी चालू आहे, असंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं.